सावंतवाडीच्या विकासासाठी राजघराण्याचा पुढाकार;
युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले नगराध्यक्षपदाच्या रिंगणात
सावंतवाडी
सावंतवाडीच्या राजघराण्याची १९ वी पिढी राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले या येत्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. तब्बल ३५ वर्षांनंतर सावंतवाडीच्या राजघराण्याने निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेत खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले उपस्थित होत्या. यावेळी युवराज लखमराजे भोसले म्हणाले की, “महिला आरक्षणाचा विचार करून आम्ही श्रद्धाराणी भोसले यांचे नाव पुढे करत आहोत. लोकसेवेच्या हेतूने राजघराणे पुन्हा एकदा सक्रिय होत असून, महायुतीशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरु आहे.”
श्रद्धाराणी भोसले म्हणाल्या, “राजकारण माझे मूळ क्षेत्र नसले तरी सावंतवाडीच्या विकासासाठी आणि परंपरा टिकवण्यासाठी मी काम करणार आहे. सावंतवाडीला जागतिक पातळीवर नेण्याचा माझा संकल्प आहे. पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि शहराचा सर्वांगीण विकास हा माझा प्रमुख अजेंडा असेल.”
राजघराण्याचे ज्येष्ठ सदस्य खेमसावंत भोसले आणि शुभदादेवी भोसले यांनीही श्रद्धाराणी भोसले यांच्यावर विश्वास व्यक्त करत, त्यांच्या माध्यमातून राजघराण्याचा सामाजिक आणि विकासात्मक वारसा पुढे नेला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशीही चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या निर्णयामुळे सावंतवाडीतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नव्या घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
