*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.ऐश्वर्या डगांवकर लिखित अप्रतिम काव्य रसग्रहण*
*बारव* (शांता शेळके.)
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने..
खोल खोल आहे भारी
माझ्या मनाची बारव
फसाल हो जाऊ नका
बघावया तिचा ठाव
संथ गूढ निळे पाणी
जरी हेलावते वरी
कुणा ठावे, असतील–
क्रूर तळाशी मगरी
ओथंबलेले जरी आहे
तृण काठाशी कोवळे
तळीं चरणा बांधील
दुष्ट कमळांचे जाळे
माझ्या मनाची बारव
हिचे जळ रुचकर
नयनांना तोषवीत
पृष्ठीं लहरी सुंदर
येता वाऱ्याची झुळूक
जळ हर्षूनी थरारे
चोच लावूनिया जाती
कधी गोजिरी पाखरे
मुग्ध भावना गाैळणी
येती घेऊन घागरी
निळ्या जळाचा या अंश
नेती वाहूनिया शिरी
पुष्ट विकारांचे गोप
कधी जळात डुंबती
कधी कल्पना– बालके
जळ ओठाने चुंबिती
निळ्या गुढ आकाशाचे
कधी पडे प्रतिबिम्ब
कधी हितगूज करी
शेजारचा कडुलिंब
नानापरीची चालते
अन्तरंगी खळबळ
जरी माझ्या बारवेचे
वर संथ दिसे जळ
खोल खोल आहे भारी
माझ्या मनाची बारव
फसाल हो जाऊ नका
बघावया तळठाव
शांता शेळके.
बारव चा अर्थ विहीर.या कवितेत शांता ताईंनी मनाला विहिरीची उपमा दिली किती सार्थ आहे नाही?विहीरीचा तळ कुणाला दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्या मनाचाही थांगपत्ता
लागत नाही.वरवर शांत दिसणा-या मनुष्याच्या
मनात काय दडले आहे हे कळत नाही . विहीरीत दडलेल्या अनेक मगरी सारख्या विषारी प्राण्यांसारखे तर पाण्यास निर्मळ
करणारे कासव ही तिच्यात असतात.माणसाचे मन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते.त्याच्या मनात चांगले आणि वाईट दोन्ही विचार असतात.त्यात खोल डोकावून पाहिलं तर तुमची फसगत होऊ शकते.
ज्याप्रमाणे विहीरीच्या काठावर कोवळी हिरवी तृणपाती आढळतात ,आतमध्ये सुंदर कमळं
फुलली असतात .त्यांना पाहून मनुष्याला ती सुंदर कमळं तोडण्याचा मोह होतो, परंतु जेव्हा तो जलाशयात उतरतो तळाशी असलेल्या गाळात तो फसतो कारण कमळ चिखलातच
फुलते.त्याचप्रमाणे मनुष्याचे मन हे वरवर कितीही चांगले दिसत असले तरी आत अनेक विकारांनी भरलेले असते.
पुढे कवयित्री म्हणते माझ्या मनाच्या बारव चे पाणी तुम्हाला जरी खूप रुचकर,गोड लागत असेल,सुंदर व निर्मळ वाटत असेल.त्याला पाहून तुम्ही फसाल.ज्याप्रमाणे वा -याची झुळूक
येताच पाण्यावर अनेक तरंग उठतात.ते पाहून छोटी छोटी पाखरं आनंदाने चोच मारून बागडतात.तरूण गवळणी पण ते पाणी आपल्या घागरींमध्ये भरभरून नेत असतात . आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे निळ्या रंगाच्या जळाकडे आकर्षित होतात.
त्यांच्याकडे आकर्षित होणारे बलवान गोपही आहेत जे दुष्ट विचारांनी माझ्या जळाला अशुद्ध करतात .त्यांच्या बरोबर रसपान करत असतात.
माझ्या या विहीरीत निळ्या आकाशाचे प्रतिबिंब तर आहेच पण त्याबरोबरच कधीकधी हा काठावरचा कडूलिंब पण माझ्याशी हितगुज करतो.वारा आला की झाडं हलतात आणि त्यांची काळी सावली पाण्यात पडते.तसेच दुष्ट विचारांचे प्रतिबिंब माझ्या मनाच्या विहीरीत आहे.अशाप्रकारे नाना प्रकारच्या भावनां माझ्या मनात उचंबळत असतात,खेळत असतात पण वरवर मात्र हे कुणालाच कळत नाही म्हणूनच
कवयित्री पुढे आपल्याला बजावतात,
“माझ्या मनाची विहीर ही खूप खोल आहे तिचा ठाव घ्यायला जाऊ नका.तळ शोधायचा अट्टाहास करू नका.नाहीतर शिवाय फसगतीच्या हाती काहीच येणार नाही.त्यापेक्षा वरवर जे चांगले दिसत आहे, तिथेच रहा आणि तेच लक्षात असू द्या.
सौ ऐश्वर्या डगांवकर.पुणे
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५
