*साहित्यलेणी प्रतिष्ठान व साहित्य अकादमीतर्फे परिसंवाद*
पणजी, ता. :
महिलांसाठी कार्यक्रम घेणे आणि अभिजात मराठीसाठी हे महत्त्वाचे आहे. मराठीच्या कार्यक्रमांनाही साहित्य अकादमीचे यापुढेही सहकार्य लाभेल अशी ग्वाही, केंद्रीय साहित्य अकादमीच्या मुंबई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर यांनी दिली. उत्तमोत्तम कार्यक्रमाचे प्रस्ताव द्यावेत, असेही ते म्हणाले.
एकंदर साहित्यातच महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. महिलांच्या सहभागाशिवाय साहित्य परिपूर्ण होत नाही, असे प्रतिपादन बीजभाषणात प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले.
साहित्यलेणी प्रतिष्ठान व केंद्रीय साहित्य अकादमी नवी दिल्ली मुंबई प्रभागातर्फे गोमंतकीय साहित्यातील स्त्री लेखिकांचे योगदान या विषयावरील एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन पणजीत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सौ. चित्रा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक, स्वागत केले व कार्यक्रमाचा उद्दिष्ट सांगितले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन चंद्रशेखर गावस यांनी केले. मुक्तिपूर्व आणि मुक्तिनंतरच्या गोमंतकीय मराठी साहित्याचा आढावा कुलकर्णी यांनी बीजभाषणात घेतला.
कथा, ललित आणि कादंबरी, कविता, लोकवाङ्मय, संपादित वाङ्मय व आत्मचरित्र आदी विषयांवर उहापोह करण्यात आला. लोकवाङ्मयात स्त्रियांचा सहभाग या विषयावर हेमंत अय्या यांनी सोदाहरण व साभिनय सादरीकरण केले. कथेवर सौ. दीपा मिरिंगकर यांनी टिपण सादर केले. अपूर्वा बेतकेकर यांनी ललित निबंध व नीता तोरणे यांनी आत्मचरित्र शोधनिबंध सादर केले.सारिका आडविलकर यांनी. कवितेवर विवेचन केले. पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. बिभीषण सातपुते तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी भूषविले.यावेळी अकादमीचे कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश नागर यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मान कऱण्यात आला. सौ. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सुमारे दीडशे रसिक श्रोते उपस्थित होते.

