सावंतवाडीत गांजासह युवक अटकेत; पोलिसांची धडक कारवाई
सावंतवाडी
सावंतवाडी शहरात गांजा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला स्थानिक पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. जावेद पीरसाब शेख (वय ३८, रा. मोरडोंगरी) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून अंदाजे ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मोरडोंगरी परिसरात आरोपी जावेद शेख हा आपल्या घराच्या अंगणात, पाण्याच्या टाकीजवळ गांजा विक्रीसाठी थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक खंदरकर, हवालदार प्रवीण वालावलकर, राऊत आणि मंगेश शिंगाडे यांच्या विशेष पथकाने तत्काळ कारवाई केली.
पथकाने ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली. त्यानंतर घराच्या परिसराचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान आरोपीकडे गांजा सापडल्याने तो ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांनी पंचनामा करून जप्त केलेला गांजा आणि आरोपीस पोलीस ठाण्यात आणले असून, अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार आगामी काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

