लॉ कॉलेज कुडाळसाठी पहिलं क्रीडापदक
कुडाळ :
मुंबई विद्यापीठ आणि सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर जिल्हा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळच्या अभिजीत लोखंडे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक पटकावले.
या स्पर्धेसाठी अभिजीत लोखंडे आपले गुरु आणि ट्रॅफिक पोलीस पदावर कार्यरत असणारे ट्रेनर आशिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच दिवस कठोर मेहनत करत होता. अभिजीतच्या पणजोबांपासून सुरू झालेला कुस्तीचा हा दैदीप्यमान वारसा त्याचे आजोबा व त्याचे वडील यांनी जोपासला व लोखंडे कुटुंबीयांचे चौथ्या पिढीतील वारसदार अभिजीत आणि अभिजीतचा भाऊ समर्थपणाने पुढे नेत आहेत.
लहानपणापासूनच अभिजीतचे आई-वडील ज्ञानदेव लोखंडे व सौ. माया लोखंडे यांचा खंबीर पाठिंबा अभिजीतला लाभल्यामुळेच त्याला हे यश मिळवता येणे शक्य झाले. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापासून बक्षीस मिळवण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये अभिजीतचा पंढरपूर येथील मित्र श्रीनाथ करवर याचीही त्याला मोलाची साथ मिळाल्याचे अभिजीतने सांगितले.
अभिजीत लोखंडे हा सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलूज मधल्या खुडूस या गावचा रहिवासी असून लॉचे शिक्षण घेण्यासाठी त्याने लॉ कॉलेज कुडाळ मध्ये 2024 साली प्रवेश घेतला. लॉचे शिक्षण घेत असतानाच लहानपणापासून असणारी व्यायामाची व कुस्तीची आवडही त्याने जोपासली.
यापूर्वी लॉ कॉलेज कुडाळच्या विद्यार्थ्यांनी इतर अनेक स्पर्धांमध्ये उज्वल कामगिरी केलेली आहे पण कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा अभिजीत हा लॉ कॉलेज कुडाळचा पहिला विद्यार्थी ठरला आहे व लॉ कॉलेज कुडाळसाठी सुद्धा क्रीडा प्रकारातील हे पहिलेच बक्षीस असल्याने लॉ कॉलेज कुडाळचे संस्थापक व्हिक्टर डांटस, प्राचार्य डॉ. शिल्पा मर्गज तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्याकडून अभिजीत लोखंडेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
