टी.ई.टी. परीक्षेतील अपयशाच्या भीतीने शिक्षकाची आत्महत्या; आंबोलीतील दुर्दैवी घटना
आंबोली
गेळे येथे राहणारे व आंबोली-गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ मध्ये कार्यरत असलेले शिक्षक आनंद सुरेश कदम (वय ३५) यांनी आत्महत्या करून आपल्या जीवनाचा दुर्दैवी अंत केला. त्यांनी आपल्या राहत्या घरात खोलीतील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत टी.ई.टी. परीक्षेत यश न मिळण्याची भीती व्यक्त केली होती, त्यामुळेच नैराश्याने ग्रस्त होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
शुक्रवारी सकाळीच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तेरसे यांच्याकडे शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड सुपूर्द केले आणि आठ दिवस रजेवर जात असल्याचे सांगून अर्धा दिवस टाकून शाळेतून निघून गेले. वाटेत त्यांना भेटलेल्या काही लोकांच्या मते, ते अस्वस्थ वाटत होते. दुपारी घरी परतल्यानंतर ते थेट आपल्या खोलीत गेले.
आत्महत्येपूर्वी त्यांनी गडहिंग्लज येथील एका सहकारी शिक्षकास फोन करून, “माझा फोन लागला नाही तर वाट पाहू नकोस,” असे सांगितले होते. दरम्यान, त्यांचे आई-वडील पुण्याला गेले होते, तर भाऊ आंबोली येथे कामावर होते. घरात भावजय एकट्याच होत्या.
सायंकाळी भाऊ घरी आल्यानंतर दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर आनंद कदम यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. लगेच आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार संतोष गलोले व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
या घटनेमुळे कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, शिक्षकी पेशातील मानसिक तणावाचा गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
