You are currently viewing टाटा आधुनिक काळातील संत! – चंद्रकांत दळवी

टाटा आधुनिक काळातील संत! – चंद्रकांत दळवी

*टाटा आधुनिक काळातील संत! – चंद्रकांत दळवी*

*टाटा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न*

पिंपरी

‘जे आर डी आणि रतन टाटा हे आधुनिक काळातील संत आहेत!’ असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात चंद्रकांत दळवी बोलत होते. लातूरचे आमदार शिवाजीराव कव्हेकर अध्यक्षस्थानी होते; तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुरस्कार प्रदान सोहळ्यात ॲक्सिस इंजिनिअरिंग (तळवडे) चे संचालक महेश शिंदे (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगरत्न पुरस्कार), धनश्री एन्टरप्राइजेस (भोसरी) च्या संचालिका वैशाली देशमुख (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार), सिद्धकला इंजिनिअर्स (भोसरी) च्या दीपा भांदुर्गा (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगसखी पुरस्कार), ब्राईट इंडस्ट्रीज (भोसरी) चे संचालक संतोष शिंदे (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगभूषण पुरस्कार), त्रिशूल फोर्जिंग (चिंचवड) चे संचालक पांडुरंग सुतार (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगभूषण पुरस्कार), हॉटेल संगम ग्रुप (सांगोला) चे संचालक नवनाथ केदार (भारतरत्न जे आर डी टाटा युवा उद्योजक पुरस्कार) आणि बेबडओव्हळ (तालुका मावळ) च्या कुमारी समृद्धी ढमाले (भारतरत्न जे आर डी टाटा युवा उद्योजिका
पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले.

चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की, ‘टाटा उद्योगसमूहाने केवळ पुणे परिसराचा औद्योगिक विकास केला नाहीतर देशाच्या विकासात मोठे योगदान दिले; कारण देशाप्रति बांधिलकी असणारा हा उद्योगसमूह आहे. एआय तंत्रज्ञानामुळे पुढील काळात नोकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होणार असून तरुणांनी विविध व्यवसायांकडे वळले पाहिजे. टाटांच्या नावाने मिळणारा पुरस्कार ‘भारतभूषण’ सन्मानासारखा आहे. पुरस्कारार्थी उद्योजकांनी आपले मूळ गाव दत्तक घेऊन त्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे!’ असे आवाहनही त्यांनी केले. मनोहर पारळकर यांनी, ‘अजूनही अनेक कुटुंबांमध्ये मुलांनी नोकरी करावी, अशी मानसिकता आहे. त्यामुळे उद्योजक हे समाजातील हिरे असून त्यांना पुरस्काराचे कोंदण प्रदान केले पाहिजे!’ असे मत व्यक्त केले. शिवाजीराव कव्हेकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘भारत जागतिक स्तरावर मोठ्या वेगाने महाशक्ती होण्यासाठी वाटचाल करीत असताना सत्य, सदाचार अन् मानवता यांचे अधिष्ठान असलेल्या टाटा उद्योगसमूहाचे त्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे!’ असे प्रतिपादन केले.

वृक्षपूजन आणि कुमार खोंद्रे यांनी सादर केलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पोवाड्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘टाटांना अभिप्रेत असलेला २१व्या शतकातील उद्योजक’ या विषयावरील व्याख्यानातून जे आर डी आणि रतन टाटा यांचे चरित्रकथन केले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून, ‘टाटा उद्योगसमूहाचे आचार, विचार आणि सामाजिक योगदान पुरस्कारार्थींनी अंगीकारावे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अरुण गराडे, जयश्री श्रीखंडे, जयवंत भोसले, महेंद्र भारती, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, सुप्रिया सोळांकुरे, सीमा गांधी, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिमा काळे यांनी आभार मानले. संगीता झिंजुरके यांनी सादर केलेल्या ‘वाद नसाया पाहिजे’ या कवितेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा