*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ऐश्वर्या दगांवकर लिखित टपाल दिवसानिमित्त पत्र*
*पत्र*
काळाच्या आड गेलेलं पत्रलेखन. आजकाल मोबाईलवर टाईप करून आपण मेसेज पाठवतो पण त्यात आपलेपणा न जाणवता यांत्रिकीकरण जास्त वाटतं. पत्र म्हटलं की सानेगुरुजींची सुंदर पत्रे ,नेहरूजींनी इंदिरेस पाठवलेली पत्रे आठवतात.ती पत्र काही वेगळ्याच धाटणीची होती.त्यातून सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि आपल्या सणावारांविषयी माहिती असायची . त्यातून नानाविध ज्ञानवर्धन होत असे. दूस-या प्रकारची पत्रं म्हटली तर ती आपली कौटुंबिक संबंध जपणारी असायची..
पहिले पत्राच्या लिखाणावरून लिहीणा-याचे भाव ओळखता यायचे.भावना अनावर झाल्या की दोन अश्रूंचे थेंब त्या पत्रावर पडायचे मग ती पुसट झालेली अक्षरं वाचतांना नकळत आपल्याही उरात दाटून यायचे.रागाने लिहिलेल्या पत्राची अक्षर शब्दातून व्यक्त व्हायची तर मायेने लिहीलेल्या पत्रामध्ये ती व्यक्ती डोळ्यासमोर यायची एक ना अनेक भावना या पत्रांतून व्यक्त होत असायच्या.तर थरथरत्या हाताने लिहीलेल्या पत्राची तुटक अक्षर मनाला व्यथित करून जायची.ह्या सर्व भावना आता आपल्याला दिसत नाही.पूर्वी पत्र एका तारेच्या आकड्यावर वाचून ठेवली जायची.कधीतरी आठवण आली की ती परतपरत वाचली जायची.पत्र म्हटलं की जुन्या काळातील ‘फुल तुम्हे भेजा है खतमें, ये मेरा प्रेमपत्र पढकर तर मधल्या काळातले ‘ डाकिया डाक लाया ‘ चित्रपटातील राजेश खन्ना आठवतो आणि त्याच्या अवतीभवती जमणारी गावातील माणसं आठवतात.त्या वाट पहाण्यात कुणी म्हातारी आई असायची तर कुणी प्रेमिका .तर कधी मुलाने पाठवलेल्या मनीऑर्डर ची आस असायची.आपले पत्र नाही आलं म्हटलं की सुरकुतलेल्या चेह-यावरची वेदना आजही मनाला स्पर्शून जाते.तर कधी नाम चित्रपटातील
अत्यंत हृदयस्पर्शी गाणं ‘ चिठ्ठी आई है आई है चिठ्ठी आई है ‘या गाण्यांची आठवण येते.तर कधी सीमेवर वाट पहाणा-या सैनीकांची मनोदशा दर्शविणारे गाणे आठवते ते ‘ संदेसे आते है ‘ घरगुती पत्रांमध्ये आंतरदेशीय पत्रावर अगदी उभ्या आडव्या पट्टीवर पण ता.क.लिहून भावना ओतप्रोत होत असायच्या.तर कधी पोस्टकार्ड वर कुंकू आणि अक्षता चिकटवून घरात होणा-या मंगल कार्याचे आमंत्रण असायचे.सुरूवातीला आदरवाचक संबोधन देखील विविध प्रकारचे असायचे.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष (स.न.वि
वि.) तर घरातील ज्येष्ठ लोकांसाठी . तीर्थ स्वरूप राजमान्य राजश्री (ती.रा.रा.)असेही संबोधन असायचे.सर्वात शेवटी .मोठ्यांना नमस्कार लहानांना आशीर्वाद (मो. न.ल.आ.)
शेवटी अगदी विनम्रतेने
कळावे लोभ असावा विनंती.या वाक्याने पत्राची सांगता व्हायची.आज पत्र शब्द वाचला आणि सर्व आठवलं.
या निमित्ताने माझी एक रचना..
पत्र
पत्र म्हणजे एक संवेदना एकमेकांच्या हृदयापर्यंत पोचणारी.
पत्र म्हणजे निरागस भावनांनी
भरलेलं गाठोडं
एकाने बांधावं आणि दूस-यानं
हळूवारपणे खोलावं.
पत्र म्हणजे एक कौटुंबिक भावबंध
सुखदुःखाचे एकमेकांना जोडणारे रेशमी बंध.
पत्र म्हणजे भावनिक जिव्हाळा
आंबटगोड आठवणींचा भेंडोळा.
नानाविध भावनांचा असा गुंता
अलगदपणे सोडवतानाआपणच गुंतून पडावे असा भोवरा.
नात्यांची माहिती देणारा एक लेखी पुरावा
मायेने ओथंबलेला आणि वेळ पडल्यास कानउघाडणी करणारा.
तुम्हाला वाट पहायला लावणारं तरी हवंहवसं वाटणारं पत्र म्हणजे काळजाचा तुकडा.
सौ ऐश्वर्या डगांवकर.
पुणे
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५.
