You are currently viewing सावंतवाडीच्या गंजिफा कलेचा राष्ट्रीय सन्मान!

सावंतवाडीच्या गंजिफा कलेचा राष्ट्रीय सन्मान!

*सावंतवाडीच्या गंजिफा कलेचा राष्ट्रीय सन्मान!*

*भारतीय टपाल विभागाने दशावतार गंजिफा कलेवर जारी केले विशेष पोस्ट कार्ड*

*सावंतवाडी:*

१६व्या शतकात भारतात आलेली “गंजिफा” कला सावंतवाडी संस्थानाच्या माध्यमातून आजही जोपासली जात आहे. या अनोख्या वारशाचा पुन्हा एकदा देशभरात गौरव झाला आहे. भारतीय टपाल विभागाने गंजिफा कला आणि दशावतार विषयावर आधारित विशेष पोस्ट तिकीट व पोस्टकार्ड प्रसिद्ध करून सावंतवाडीच्या कलासंस्कृतीला राष्ट्रीय व्यासपीठ दिले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यावेळी देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी नव्हे तर गोलाकार स्वरूपातील पोस्टकार्ड प्रकाशित करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर सावंतवाडी राजवाड्यातील “गंजिफा” कलावंतांचा सावंतवाडी राजघराण्याकडून विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी उपस्थित होते राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले.
गंजिफा कला जपणाऱ्या कलाकारांमध्ये मोहन कुलकर्णी, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, रामचंद्र ठाकूर, वर्षा लोंढे, विश्वनाथ कुलकर्णी, लाडू ठाकूर, गायत्री कुलकर्णी, सुकन्या पवार, गौरी पारकर, आर्या देवरूखकर, सोनाली कुंभार, यश धुरी, भुवन हळसकर, निकिता आराबेकर, सचिन कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

राणीसाहेब शुभदादेवी भोसले म्हणाल्या, “राजेसाहेब शिवरामराजे आणि राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या प्रयत्नांमुळे गंजिफा कला आज पुन्हा उजेडात आली आहे. पोस्टकार्डद्वारे सावंतवाडीची कला आता देशोदेशी पोहोचेल, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” त्यांनी गंजिफा कलावंतांना सरकारी राजाश्रय मिळावा, अशी मागणीही यावेळी केली.

युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, “या पोस्टकार्डवर कृष्णाचे दहा अवतार सुंदर गंजिफा शैलीत साकारण्यात आले आहेत. यामुळे नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख होईल.”

ज्येष्ठ कलावंत मोहन कुलकर्णी यांनी भावनिक शब्दात म्हटले, “हा सन्मान आमच्यासारख्या कलाकारांच्या मेहनतीचा आणि सावंतवाडीच्या कला-संस्कृतीचा गौरव आहे.”

या कार्यक्रमाला डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्रा. जी.एम. शिरोडकर, प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल, तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा