शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला छोटा हत्तीची धडक; गंभीर जखमी अवस्थेत गोवा येथे हलवले
दोडामार्ग
आडाळी येथे रस्ता ओलांडताना गाडीची जोरदार धडक बसून नूतन विद्यालय कळणेचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके (वय १४) गंभीर जखमी झाला आहे. घटनानंतर तातडीने त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्याला गोवा-आजिलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सकाळी शाळेत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत होता. बस आल्यावर तो विरुद्ध बाजूस धावत गेला, तेव्हा समोरून येणाऱ्या टाटा एस (छोटा हत्ती) वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. या धडकेत त्याचे डोके गाडीच्या दर्शनी भागावर आदळल्याने तो रस्त्यावर फेकला गेला आणि डोक्याला गंभीर इजा झाली.
अपघातानंतर स्थानिकांनी त्वरीत मोरगाव आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
