You are currently viewing कोजागरी काव्यसंमेलनात साहित्य-कलांचा बहारदार संगम!

कोजागरी काव्यसंमेलनात साहित्य-कलांचा बहारदार संगम!

आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या साठाव्या मासिक कार्यक्रमात कवितांचे, कथांचे, संगीताचे आणि जादूचे रंग उधळले

 

सावंतवाडी :

आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या साठाव्या मासिक कार्यक्रमांतर्गत कोजागरी काव्यसंमेलनाचा तथा विविध कलादर्शनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, उपकार्यवाह रत्नदीप मालवणकर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ.श्रीराम दीक्षित, साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर व मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ चे कार्यवाह गजानन मांद्रेकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात डॉ.श्रीराम दीक्षित, प्रा.नीलम कांबळे, शेखर पणशीकर, उर्जित परब, स्नेहा नारिंगणेकर, रवींद्र पणशीकर, भालचंद्र दीक्षित, प्रियदर्शनी म्हाडगुत, दीपराज परब यांनी स्वरचित, तर अर्चना लोखंडे व प्राची पालयेकर यांनी संकर्षण कऱ्हाडे यांच्या कविता सादर केल्या. गजानन मांद्रेकर यांनी ‘गाडी गाडी आली…’ ही पारंपरिक बालकविता सादर केली. तर विनय सौदागर यांनी मालवणीत भाषांतरित केलेला संत तुकारामांचा अभंग सादर केला.

सरोज रेडकर यांनी माधुरी शानबाग यांची ‘जनरेशन गॅप’ ही,तर स्नेहा नारिंगणेकर यांनी व.पु.काळे यांची ‘मी तिथे वाट पहात आहे’ ही कथा सादर केली.

अरुण धरणे यांनी ‘नाम तेची रूप,रूप तेची नाम’ हा अभंग बासरीवर सादर केला. डॉ.श्रीराम दीक्षित, शेखर पणशीकर, राजेश वैज, मोहन जाधव, अनिल निखार्गे व मुक्ताई पणशीकर यांनी विविध गीते सादर केली, तर भालचंद्र दीक्षित यांनी जादूचे प्रयोग सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.श्रीराम दीक्षित यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल प्राची पालयेकर यांनी ऋणनिर्देश केला. विनय सौदागर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अडतीस साहित्य रसिकांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा