You are currently viewing कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*कोजागिरी पौर्णिमा*

 

कोणत्याही मातीत रुजू फुलणाऱ्या लोकजीवनाला घडविण्यात संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण उत्सवांचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं. माणसांना जवळ आणण्याचं एकत्र बांधून ठेवण्याचं तसेच भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता साधण्याचं मौलिक सांस्कृतिक कार्य सण-उत्सव करत असतात. म्हणूनच आपल्या देशातल्या सांस्कृतिक जीवनात सण, उत्सवांना खूपच महत्त्व आहे….

या दिवसाला धार्मिक महत्त्वही आहे.

प्रत्येक प्रांतानुसार कोजागिरी पौर्णिमा साजरे करण्याचे स्वरूप बदलते..

कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून “को जागर्ती ? ” असा प्रश्न विचारते असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. अश्विन पौर्णिमा, शारदीय पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा अशा काही नावांनी कोजागिरी पौर्णिमा ओळखली जाते.. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत

जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘”कोजागरी पौर्णिमा’” म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमा ही पावसानंतरची पहिली पौर्णिमा असते. या पौर्णिमेला अश्विन किंवा शरद पौर्णिमा असेही म्हणतात. शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र दिसते, सुंदर टिपूर चांदणे पडते. शीतलता आणि सुंदरता यांचा आल्हाददायी सुंदर समन्वय म्हणजेच पौर्णिमा… पौर्णिमेचा चंद्र हा तर पूर्णत्वाचा आविष्कार आहे नाही का.!

पावसाळा संपल्यानंतर येणारी ही पहिलीच पौर्णिमा… पावसाच्या या चार महिन्यांमधे आकाश स्वच्छ आणि निरभ्र नसतं परंतू अश्विनातल्या या पौर्णिमेला आकाश खूप दिवसांनी अगदी स्वच्छ असतं आणि चंद्र सुध्दा प्रथमच एवढा मोठा आणि समीप भासतो त्यामुळे हे स्वच्छ सुंदर आल्हाददायक वातावरण फार दिवसांनी वाटयाला आल्याने त्याचे अप्रुप वाटणे अगदी साहजिक असते.

चंद्र चांदणे आकाश सजवी

आसमंत उजळून जाई

कोजागिरी पौर्णिमेची

रात्र रंगून जाई… !!

अर्ध्यावर झालेली शेतीची कामं, तयार झालेली पिकं वार्‍यावर डोलू लागलेली आणि पाऊसही परतीच्या वाटेवर निघालेला…

काही भागात नवीन पिकं (नवं धान्य) हाताशी आलेली असतात –कापणीस तयार असलेली…. ग्रामीण भागात ही पौर्णिमा नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हस्त नक्षत्राची अखेर आणि शरद ऋतूचं आगमन आणि त्यात येणारी ही शरद पौर्णिमा.. वर्षा ऋतूनंतर आकाश निरभ्र झाल्यावर येणारी ही पहिलीच पौर्णिमा असल्याने ग्रामीण भागात दिवसभर शेतात कापणीची कामे केल्यावर शरद पौर्णिमेच्या रात्री शेतात खळं (अंगणाप्रमाणे मोकळी जागा) तयार करून त्या जागेत कापणी केलेल्या धान्याच्या राशी एकावर एक रचल्या जातात आणि त्या राशीवर चंद्राला नैवेद्य दाखवण्यासाठी दुधाचं पातेलं ठेवलं जातं. त्यानंतर चंद्र दर्शन घेऊन नैवेद्य दाखवलेलं दूध प्रत्येकाला वाटलं जातं तसेच धान्याच्या राशींचीही पूजा केल्यावर मगच ते धान्य कोठारापर्यंत नेलं जातं. तसचं चंद्र आकाशात मध्यावर येईपर्यंत चंद्राकडे पाहिलं जात नाही.. त्यानिमित्तानं आपोआपच जागरण घडतंच..

सगळीकडे वनराई हिरवाईने नटलेली असते. रानात डोंगरात अनेक फुलांनी विविध रंगांची उधळण केलेली असते. पक्षांच्या किलबिलाटाने, फुलपाखरांच्या विहराने डोंगर- द-या गुंजत असतात. निळ्याभोर आकाशात ढग विहरत असतात तर शेतामध्ये पिके डुलत असतात. अवघी धरती संपन्नतेने नटलेली असते. अश्या आल्हाददायी वातावरणात मानवी मन आनंदाने डोलते, आनंदाने न्हाऊन निघत असते.अश्यातचं कोजागिरी पुनवेची रात्र समृद्धीचा दुग्धशर्करा योग घेऊन आपल्या दारी येते..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा