*ज्येष्ठ साहित्यिका, गझलकार प्रा.सुनंदा पाटील लिखित अप्रतिम लेख*
*अम्ही चालवू हा पुढे वारसा*
*भूपाळी आणि ढोल दमामे गर्जती होते काकड आरती*
नमस्कार . बघता बघता देवीचे नवरात्र संपले आहे . विजयादशमी झाली . आज कोजागिरी पौर्णिमा ! या दिवशी गेले महिनाभर बसणारी भुलाबाई. या उत्सवाची सुद्धा सांगता होईल . परंतु हिंदू समाजाच्या चालीरीती अशा आहेत की , वर्षभर काही ना काही सण, उत्सव, परंपरा, कुलाचार हे सुरूच राहतात . महत्वाचं म्हणजे *त्या प्रत्येक उत्सवात काव्य हे असतंच* . त्याचप्रमाणे कोजागिरीपासून तर कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आकाश दिवा किंवा पाताळ दिवा लावण्याची सुद्धा आपल्याकडे परंपरा आहे . कारण याच मधल्या काळात दिवाळीचा सणही येत असतो .
या काळात स्त्रिया पहाटे उठून तुळशी समोर रांगोळीच्या द्वारे कार्तिक मास काढतात . यात राधाकृष्ण , तुळशीवृंदावन , चंद्र – सूर्य – शंख – चक्र – आवळीचं झाड – ३३ गोपद्म अशा अनेक आकृती असतात . लग्न होऊन सासरी आलेल्या छोट्या मुलींना या संस्कारांव्दारे चित्रकलेचं , वनस्पतीशास्त्राचं , अवकाशाचं शिक्षण परंपरेतून दिलं जायचं असं इथे म्हणता येतं .
याच काळातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे काकड आरती आणि त्यासाठी म्हटली जाणारी भूपाळी . अनेक मंदिरांमध्ये वर्षभर रोज भुपाळ्या म्हटल्या जातात आणि त्यानंतर आरती केली जाते . परंतु सर्वसामान्यपणे अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्तिक मास साजरा केला जातो . यात पहाटे उठून भूपाळीचा उत्सव साजरा होतो . अनेक भूपाळ्या म्हटल्या जातात . भूपाळी म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी गायला जाणाऱ्या पारंपरिक गीतांचा एक प्रकार आहे . मुळात ही सुद्धा एक कविता आहे. ही गीते शक्यतो भूप रागात बांधलेली असतात . जो सृष्टी निर्माण कर्ता , त्याची स्तुती करण्याच्या उद्देशाने म्हटल्या जातात . ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे . रात्रीचा अंतिम प्रहर किंवा दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याच्या , भूप रागातील पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून त्याला जागे केले जाते , तीच ही भूपाळी . होनाची बाळा यांची *घनश्याम सुंदरा* ही भूपाळी सर्व परिचित आहेच.
हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणजे यातील देवदेवतांना रोजच भूपाळी द्वारे जागविले जाते.
या भूपाळ्या अनेक संतांनी रचलेल्या आहेत .
त्यातली प्रथम श्री गणपतीची भूपाळी पाहूया !
*उठा उठा सकळीक /वाचे स्मरावा गजमुख*
*रिद्धी सिद्धीचा नायक / सुखदायक भक्तासी*
*अंगी शेंदुराची उटी /माथा शोभतसे किरीटी*
*केशर कस्तुरी लल्लाटी / हार कंठी साजिरा*
*कासे पितांबराची धटी /हाती मोदकाची वाटी*
*रामानंद स्मरता कंठी / तो संकटी पावतो*
भूपाळी ही सहसा चार चरणांची असते . याच्या प्रथम तिन्ही चरणात यमक साधलं जातं . शेवटची चौथी ओळ वेगळी असते . यात अक्षरे किंवा मात्रांचे बंधन नसते . मात्र मिळती जुळती अक्षरेच इथे घेतली जातात . शेवटच्या कडव्यात रचयिता जो कुणी असेल त्याचे नाव असते.
आज आपण काही भुपाळ्या बघणार आहोत . सृष्टी निर्माता , पालनकर्ता , आणि श्री शंकर या सर्वांसोबतच , आपली जी श्रध्दास्थाने आहेत , त्यांच्याही भुपाळ्या म्हटल्या जातात . त्यात तुळशी, गंगा , गाय , हेही विषय असतात . शिवाय संतांसाठीही अनेक भुपाळ्या रचलेल्या आढळतात .
श्रीरामाची भूपाळी
*उठोनिया प्रातःकाळी / जपा रामनामावली*
*स्वये ध्यातो चंद्रमौळी / शैलबाळीसमवेत*
*राम योग्यांचे मंडणा राम भक्तांचे भूषण*
*राम धर्माचे रक्षण / संरक्षण दासांचे*
*रामे त्राटिका मारिली /रामे जानकी पर्णिली*
*रामे शिळा उद्धरिली /गणिका केली ती मुक्त*
*रामे पाषाण तारिले / रामे दैत्य संहारीले*
*रामे बंदी सोडविले / मुक्त केले सुरवर*
*रामे रक्षिले भक्ताची /रामे सोडविले देवासी*
*रामदासाचे मानसी / रामदासी आनंद ॥*
या शिवाय
*राम सर्वांगी सावळा / देह अलंकार पिवळा*
*नाना रत्नांचिया कळा / अलंकार शोभती ॥*
ही सुद्धा श्रीरामांची भूपाळी प्रसिद्ध आहे.
एक गंगेची भूपाळी आपण बघूया !
*उठोनिय प्रातःकाळी / वदनी-वदा चंद्रमौळी*
*श्री बिंदू माधवा जवळी / स्नान करा गंगेचे /स्नान करा गोदेचे ॥*
*स्नानदान जया अंतरी / घडेल भागीरथीच्या तिरी*
*कृपा करील त्यावरी / ऐसे महात्म्य गंगेचे*
*भागीरथीचे स्नान करा /हृदयी स्मरा गंगाधरा*
*चुकेल चौऱ्यांशी चा फेरा / ऐसे महात्म्य गंगेचे ॥*
*गंगा आहे स्वर्गावरती / पाताळी ते भोगावती*
*मृत्यूलोकी हे विख्याती ‘ ऐसे महात्म्य गंगेचे ॥*
*कृष्णा वेणा तुंगभद्रा / शरयू कालिंदी नर्मदा*
*भीमा भामा मुख्य गोदा /स्नान करा गंगेचे ॥*
याशिवाय श्रीधराची / दशावताराची / पंढरीची / शंकराची अशा अनेक भूपाळ्या आहेत .
भूपाळ्या संपल्या की,
*ढोल दमामे गर्जती / होते काकडआरती*
कार्तिक महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो . या महिन्यातच पहाटेच्या वेळी अनेक मंदिरातून होणाऱ्या काकड आरतीच्या निनादाने सर्व आसमंत निनादून जातो मृदुंगाच्या आवाजाने व भक्तगणांच्या आरत्या आळवणीच्या स्वरांनी वातावरण भक्तीमय होऊन जाते .यासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते . प्रजेला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाक्रूर तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराच्या पोटी कार्तिक स्वामींनी जन्म घेतला . या कार्यासाठीच त्यांचा जन्म झाला आणि तोही कार्तिक महिन्यात त्यांच्या नावावरूनच या महिन्याला कार्तिक हे नाव पडले आहे . या महापराक्रमी पुत्राचे स्मरण म्हणून काकड आरती केली जाते , असेही काही ठिकाणी म्हणतात .
काकड आरती ही हिंदू धर्मात विशेषतः महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी देवाला जागृत करण्यासाठी केली जाणारी एक धार्मिक प्रथा आहे . काकडा उजळून ही आरती केली जाते . अनेक मंदिरांमध्ये विशेषता कार्तिक महिन्यात ही आरती होते आणि ती नित्यनेमाने होते जागे करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे ही दिवसाची पहिली आरती मानली जाते . वारकरी संप्रदायात काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे . काकड आरती वैयक्तिक तसेच सामुदायिक परंपरा आहे . दररोज किंवा विशिष्ट काळात म्हणजे कार्तिक महिन्यात ही पाळली जाते . कार्तिक महिन्यात कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे काकड आरती करण्याची प्रथा आहे . या आरतीपूर्वी विविध भजने /स्तोत्रे आणि भुपाळ्या म्हटल्या जातात . संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ इत्यादी संतांनी काकड आरती रचलेल्या आहेत .
काकड आरतीला जाण्यापूर्वी भक्तगण स्नान संध्या करतात . सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते . मनात भक्तीरसाची निर्मिती होते . पापक्षालन होते . नंतर घरातील तुळशी वृंदावनाजवळ येऊन तुळशीची पूजा केली जाते .
*उठा उठा साधुसंत /साधा अपुलाले हित*
*वाया जाईल हा नरदेह /मग कैसा भगवंत*
*उठोनिया वेगेसी चला जाऊ राऊळाशी /*
*तुळशी घालूनिया ओटा / विघ्ने पळतील बारा वाटा*
*तुळशी लावूनिया दिवा /उजेड पडेल सर्व देवा*
*तुळशी सारूनिया पाणी / होईल पातकांची धुनी*
*तुळशी लावूनिया गंध /उभा पाठीशी गोविंद*
*तुळशी लावूनिया कुंकू /उभी पाठीमागे सखू “*
या पदानंतर भक्तगण टाळ मृदंगाच्या निनादात कृष्णाचा गजर करतात . हा गजर संपला की गावातून प्रभात फेरी काढली जाते . या योगे असं म्हणतात की वातावरणात भक्तीरस भरून राहतो .
काही ठिकाणी गावातून प्रभात फेरी काढून एक प्रकारची जनजागृती होते . तर काही ठिकाणी भक्तजन मंदिरात एकत्र होतात . सुरुवातीला भजने , भुपाळ्या म्हणतात . एक विठ्ठलाची भूपाळी –
*उठोनिया पहाटे / विठ्ठल पहा उभा विटे*
*चरण तयाचे गोमटे /अमृत दृष्टी अवलोका ॥*
*जागे करा रुक्मिणीवरा / देव आहे निदसुरा*
*वेगे लिंबलोण करा / दृष्ट होईल तयासी ॥*
*पुढे वाजंत्री वाजती /ढोल दमामे गर्जती*
*होते काकड आरती / पांडुरंगा चरणी ॥*
*सिंह नाद शंखभेरी / गजर होत महाद्वारी*
*केशवराज विटेवरी / नामा चरण वंदितो ॥*
आशा प्रकारे अनेक भूपाळया झाल्या नंतर आरतीला सुरुवात होते . जे मंदिर असेल त्याप्रमाणे अनेक आरत्या तिथे म्हटल्या जातात आणि नंतर काकड आरती केली जाते . आता हा काकडा कसा असतो तर शक्यतो पांढऱ्या , स्वच्छ नवीन वस्त्र घेऊन त्याच्या पट्ट्या काढून पीळ दिला जातो आणि नंतर एक ठराविक लांबीचा / कुठे बोटभर , कुठे वीतभर अशा काकडा तयार केला जातो . तो शुद्ध तुपात भिजवला जातो . प्रत्येकाच्या हातात निरंजन असेल असंच नाही . तर सगळे भक्त हा काकडा घेऊन उभे होतात . काकडा उजळतात आणि आरती सुरू होते हातात काकडा सुद्धा एका ठराविक पद्धतीने धरावा लागतो की , ज्यामुळे हातावर तूप सांडणार नाही .चटका लागणार नाही . काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो . अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला , सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो . यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया .
१)
*भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती
पंचप्राण जीव भावे ओवाळू आरती*
*ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा*
*दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा*
*काय महिमा वर्णू आता सांगणे किती*
*कोटी ब्रम्ह हत्या मुख पाहता जाती*
*राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही*
*मयूर पुच्छे चामरे ढाळती ठाईच्या ठाई*
*सत्व रजतमात्मक काकडा केला*
*भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला*
*तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनीत शोभा*
*विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥*
२)
*सहस्र दीपै दीप जैसी प्रकाशली प्रभा*
*उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा*
*काकड आरती माझ्या कृष्णसभागीया*
*चराचर मोहरले तुझी मूर्ति पहाया*
*कोंदलेसे तेजे प्रभा आलीसे एक*
*नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख*
*आरती करता तेज प्रकाशले नयनी*
*तेणे नेत्रे मिळाला एका एकी जनार्दनी ॥*
अशा अनेक आरत्या होऊन शेवटी तुळशीची आरती होते .
*जय देवी जय देवी जय माये तुळशी*
*निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी*
ही आरती सर्वांना ठाऊक आहे. पण माझ्या लहानपणी आम्ही विठ्ठल मंदिरात काकड आरतीला जात होतो, तेव्हा तुळशीची एक वेगळी आरती म्हटली जायची. ती छोटीशी आरती या ठिकाणी देते आहे .
*श्री तुळशी जय तुळशी मानव बोलता वदनी*
*ऐकून यमदुत बहु दूर पळती दिशा उल्लंघुनी*
*कोमल तुळशी वनी पाहुनिया हरीशी आनंद*
*अखंड राहे तेथे राधा रमणा गोविंद*
*या तुळशीची सेवा करता पुण्याच्या राशी*
*अपार संकट भोगुनी प्राण्या जाय मुक्तिशी*
*ओवाळू आरती तुळशी हरी पंकजनयना*
*कृष्ण तनया म्हणे सरली भ्रांतीची भ्रमणा ॥*
यानंतर नियमितपणे सद्गुरुची आरती , कापूर आरती होत असे . याच ओघात सर्वांसाठी एक मागणं मागितलं जायचं .
*आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा /माझीया सकळा हरीच्या दासा*
*कल्पनेची बाधा न हो कोणे काळी /ही संत मंडळी सुखी असो*
*अहंकाराचा वारा न लागो राजसा/ माझ्या विष्णू दासा भाविकाशी*
*नामा म्हणे जया असावे कल्याण /द्या मुक्ती निधान पांडुरंग ॥*
नंतर सगळ्यांना आरती दिली जायची . सर्वांचा सुका प्रसाद , फळं , तीर्थ एकत्र करून सर्वांना तीर्थप्रसाद दिला जायचा आणि हळुवार पूर्वेला सूर्यबिंब प्रकट व्हायचं . आजही ही प्रथा खेड्यापाड्यांमधून आणि मंदिरांमधून सुरू आहे . मात्र तथाकथित आधुनिकतेचा वारा लागलेले लोक यापासून दूर आहेत . काही लोकांनी तिथेही ह्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे . त्याला यश देणं हे आपल्याच सर्वांच्या हातात आहे !
विस्तारभयास्तव आज इथेच थांबते . अजून अनेक काकडआरत्या आणि भुपाळ्या आहेत . त्या आपल्यालाही ठाऊक आहेत .तुळशी विवाह होतो. नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीची समाप्ती ही सहसा गोपालकाल्याने केली जाते . यावेळी कुठे कुठे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह ही आयोजित केला जातो . येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या आणि आश्विन /कार्तिक महिन्यातल्या काकड आरतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा . धन्यवाद !
*प्रा. सुनंदा पाटील*
८४२२०८९६६६
