*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*”मोबाईलच्या जगात गोष्ट एका हरवल्या संवादाची “*
आज मोबाईल प्रत्येक माणसासाठी प्राणवायू झाला आहे,मोबाईल जवळ नसला म्हणजे गुदमरल्या सारख होतं मोबाईल शिवाय माणसा़च जगणं नाही इतका अंगवळणी झालाय मोबाईल.आहो मोबाईलच चार्जर जरी सापडत नसलं तरी माणूस कावराबावरा होतो.म्हणजे मोबाईल आज जेवणाइतकाच गरजेचा झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही.एक वेळ जेवन नाही मिळाले तरी चालेल पण मोबाईल जवळ असलाच पाहिजे आजची पुरूष महिला,तरूणाई, मोबाईलचे इतके व्यसनाधीन झाले आहेत की जेवताना सुध्दा मोबाईलच हवा,मोबाईल बघून जेवायचं,मोबाईल बघताबघता झोपायच चोवीस तास मोबाईल.आज प्रत्येक माणसु मोबाईल शिवाय राहूच शकत नाही. मोबाईल जितका उपयुक्त आहेत तितकाच तो दुरुपयोग सुध्दाआहे.पण कुठेही जा प्रत्येकजण हातात मोबाईल घेऊन फिरताना बोलताना दिसतील.प्रवास करताना कुठल्याही कार्यक्रमात कुठेही गेलात तरी प्रत्येक जण मोबाईलमधे डोकं घालून मग्न दिसतो.आपल्या आजूबाजूला अवतीभोवती काय घडामोडी चालल्यात याचं कुणाला काही देणंघेणं नाही.हे सगळं गढूळ वातावरण पाहून घरातले आजीआजोबांना त्यांचा काळ आठवतो.त्यांच्या काळात असं नव्हतं.साकाळी उठल्या उठल्या रामराम नाही केला तर काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं.मनात रूखरूखता असायची.एकमेकांप्रती सुखदुःखाचा संवाद असायचा. बोलल्या शिवाय कोणी घारातून बाहेर जात नसे.बाहेरून घरी आल्यावरही एकामेका़ची विचारांना होत असे. सर्व कुटूंब एकत्रितपणे जेवत असे जेवून झाल्यावर सर्वांसोबत बसुन दिवसभरातील घडामोडींवर चर्चा व्हायची त्या चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटायचे अनेक अडचणी मार्गी लागायच्या.संध्याकाळी लहान मुलं मैदानावर खेळायचे,कुदायचे पडायचे,व्यायामाला जायचे,त्याकाळी पिझ्झा बर्गर,चायनीज किंवा हॉटेलचं जेवण खात नव्हते.मोबाईल रेसिपी नव्हती.अस्सल कसलेली तव्यावर टरटर फुगलेली भाकर आणि वरवंटा पाट्यांवर वाटलेल्या तिखट मसाल्याची भाजी असा खुराक होता. म्हणून तेव्हढ्याच ताकदीची दमदार माणसं त्याकाळी होते आणि तेव्हढ्याच जोमान कामही करायची. कारण मोबाईल तेव्हा नव्हता म्हणून खानपान अंगी लागायचे.हल्ली हातात मोबाईल दिल्याशिवाय लहान मुलं जेवत नाही.त्यांच खेळन कुदन म्हणजे मोबाईल झालं आहे.म्हणूनच अरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात.आश्चर्य म्हणजे दोन ते तिनं वर्षाच्या मुलांना चष्मा लागतो म्हणजे समस्या किती गंभीर म्हणावी. घराघरात मोबाईलच जाळ अस काही विणलं गेलय की त्यातून बाहेर पडणं कोणालाही शक्य नाही.कारणं माणसं हरवलीत संवाद नाहींसा झाला.शब्द मुके झालेत.घरात असूनही संवाद हरवलाय.ही फक्त तांत्रिक किंवा सामाजिक नाही तर भावनिक आणि मानसिक आरोग्याचीही मोठी समस्या आहे.अरे घरात असूनही एकमेकांशी कोणी बोलतं नाही म्हणजे काय.एक भिंत चार मोबाईल आणि पाच वेगवेगळ्या दुनिया.कधीकाळी जे घर ‘घरासारखं’ वाटायचं,आज तिथे लोक आहेत,पण माणसं नाहीत कोणी स्वयंपाकघरात मोबाईल बघतंय, कोणी हॉलमध्ये एकटा टीव्हीशी बोलतोय,कोणी झोपायच्या आधी मोबाइलवर ‘रील्स’ चाळतोय आणि संवाद? तो केव्हाच ‘साइलेंट मोड’वर गेला आहे. घरातले चेहरे भावनाशून्य झालेत.
कधी काळी जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा आई डोक्यावरून हात फिरवायची,निट जा म्हणून सांगायची शाळेतून घरी आल्यावर डोक्यावरून हात फिरवत काहीतरी खायला द्यायची.आता काय मुलं केव्हा शाळेत जातात केव्हा घरी येतात कुणाला काहीच कळत नाही मुलं घरी येतात तेव्हा आई व्हॉट्सअॅपवर व्यस्त असते तर बाकीचे आपआपल्या खोलीत बंद.पुर्वी वडिलांचा आवाज घरभर घुमायचा आता तो आवाज मोबाईलमधल्या बातम्यांत,गेम्समध्ये किंवा यू-ट्यूबमध्ये हरवला आहे.मुलं आईवडिलांना ‘विचारत’ नाहीत, आईवडील मुलांचं ‘ऐकून घेत’ नाहीत.जेवणाच्या टेबलवर देखील संवाद नसतो.वाय-फाय किंवा नेटवर्कर बंद राहील तर बापरे आता का वेड लागेल अस होतं.मोबाईल साधन की संवादहरण काही कळतं नाही.तंत्रज्ञ चांगलं आहे,पण ते घरातल्या माणसांमध्ये अंतर निर्माण करत असेल तर ते थांबायला हवं.
मोबाईल हे संपर्काचे साधन आहे,
त्याचा वापर संवाद साधण्यासाठीच झाला पाहीजेत संवाद तोडण्यासाठी नाही! गंमत म्हणजे एकाच घरात राहून सुद्धा व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंग पाठवतात अरे तेव्हढ्यासाठी तरी बोलते व्हा!पण नाही.आणि कोणी म्हणत असेल तर म्हणताना एकमेकांकडे पाहिलंही जात नाही.याचा परिणाम काय तर संवादाचा अभाव आणि नात्यांमध्ये दुरावा,एकटेपणा,नैराश्य,सहवास असूनही सहानुभूती हरवत आहे.एका घरात चार लोक राहतात,पण प्रत्येकाची ‘दुनिया’ वेगळी कोणी फेसबुकमध्ये,कोणी इन्स्टाग्राममध्ये, कोणी चॅटिंग मध्ये,तर कोणी टीव्ही समोर.मुकं होवून रहायचं याला काही अर्थ आहे का? संवाद परत मिळवायचा असेल तर नो मोबाईल, घरात दररोज कमीत कमी एक तास असा असावा की सगळे मोबाईल बाजूला ठेवून एकत्र जेवतील एकमेकांशी संवाद करतील दररोज ठराविक वेळी काढून आपल्या नातेवाईकांशी बोलतील.जर प्रत्येक घरात अशी सवय लागली तर माणसाप्रति मनमोकळा संवाद होईल.पण नाही, आज आपण तंत्रज्ञानाच्या इतक्या आहारी गेलो आहोत,की आपल्या हातातला मोबाईल आपल्याला आपल्या माणसांपासून दूर नेत आहे.आपल्या घरातल्या खोलींमध्ये दरवाजे असले तरी,संवादाचे दरवाजे बंद करू नका नाहीतर एक दिवस ती खोली “घर” म्हणून उरणार नाही.लक्षात ठेवा घरात जेव्हा माणसांपेक्षा मोबाईल जास्त सक्रिय असतो,तेव्हा घरात घरपण नसल्यासारखे वाटायला लागते आपण तंत्रज्ञानाच्या नव्हे,तर माणुसकीच्या युगात जगायला आलो आहोत.आज जे काही चालतंय ना ते चुकीचं आह. जगात माणसं हरवत चालली आहे असं घडायला नको आणि व्हायलाही नको मोबाईल सोशल मीडिया,चॅटिंग या सगळ्यांमुळे माणसं ‘जगाशी’ जुळले,पण घरच्यांशी तोडले गेलेत.आज मोबाईलवर हजारो फ्रेंड्स आहेत,पण जेव्हा मन दुखतं तेव्हा आपल्याला आई-वडिलांचा हात हवाहवासा वाटतो आता तेच हात मोबाईलच्या किपॅड वर रेंगाळतांना दिसतात.घरात सारे एकमेकांसमोर असताना देखील डोळे स्क्रीनकडे, आणि कान हेडफोनमध्ये गुंतलेले असतात.संवाद हरवला की,विश्वास हरवतो.आणि विश्वास हरवल की, नातं संपायला वेळ लागत नाही.
वडिलांच्या चेहऱ्यावर शांतता असते, पण ‘मन’ आतल्याआत मरत असत
आईच्या चेहऱ्यावर हास्य असतं,पण ती मनातलं दुःख व्यक्त करता नाही.
आणि मुलांची तर त्यांच्या त्यांच्या खोलीत त्यांची वेगळी ‘दुनिया’ असते. अर्थात घरात माणसं असतात पण माणसुपण नसतं.माणसं एकलकोंडे झाले आहेत,मानसिक संतुलन बिघडत चाललंय एकमेंकांप्रती भावनिक ओलावा कायम राहण्यासाठी एकमेकांमधे संवाद महत्वाचा आहे.आपण स्वतःला घरातल्यांना किती वेळ देतो किती वेळ त्यांच्याशी बोलतो याच स्वत:च परिक्षण करून बघा.फक्त त्यांचा अभ्यास,त्यांची शिस्त,किंवा मोबाईलवर किती वेळ दिलास यावर चर्चा नको.मनात काय आहे,ते सांगीतल्या शिवाय काहीच कळणार नाही आपल्या माणसांच्या मनातील ऐकायला शिका.वडिलांशी नुसतं “काय झालं ऑफिसमध्ये? बसं इतकं जरी विचारलं,तरी त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलाने मला विचारलं ‘ याचं समाधान.दिसून येईल आईने दिवसभर काय केलं,थकल्यावर कास वाटतं,एव्हढ जरी विचारलं तरी मन आनंदाने भारावून जाईल.आणि घरातल्या वृद्धांच्या फक्त औषधांच्या वेळा लक्षात ठेवू नका त्यांच्या भूतकाळाचं एका म्हणजे.आपल्याला भविष्यात कसलीच अडचण येणार नाही.अगदी तसंच आई वडील आजी आजोबांनीही आपल्या मुलांची नातवंडाची विचारपूस करा त्यांची सुखदुःख अडीअडचणी,गंमती जमती दिवसभरातील घडामोडींवर चर्चा काहीतरी नवीन पदार्थ बनवून खाऊघाला म्हणजे एकमेकाप्रती आपोआप जिव्हाळा निर्माण होईल प्रेम वाढेल आणि मग आपसूकच शब्दांना बोल फुटतील,बघा करून बघा जमतंय का, मुलांनाही समजून घ्या म्हणजे आपसांत संवाद कायम राहिलं.
माणूस किती कमवतो यावर नातं नाही तर तो किती वेळ देतो,किती बोलतो कितीदा संवाद साधतो यावर नातं टिकतं.घरात माणसं असली तर ,
संवादाची कमतरता भासत नाही.
घर म्हणजे एकत्र येण्याची जागा,पण ती जागा आज एकांताची जागा होऊ लागलीय. हे थांबवायचं असेल,तर प्रत्येकाला काहीतरी जाणीवपूर्वक बदल करावा लागेल,एक छोटी सुरुवात करा किमान एक दिवस तरी मोबाईल बाजूला ठेवून आपल्या घरातील लोकांना वेळ द्या, एकमेकांकडे बघा,ऐका,बोला,समजून घ्या,कारण मोबाईल हरवल्यावर आपण लगेच शोधतो,पण माणूस हरवल्यावर मात्र,पुन्हा सापडणार नाही.आपल घर म्हणजे ‘चार भिंती’ नाहीत तर ‘चार संवादांची घरकुल आहे.मोबाईल बदलला जातो पण माणसं तिचं असतात आपली माणसं बदलतात येत नाही तेव्हा माणसं जपा कारण हरवलेली माणसं नंतर सापडत नाहीत,मोबाईल हे साधन आहे.तर माणसं ही जिव्हाळ्याची आहेत वेदना,भावना फक्त आपल्याच माणसांना कळतात.तेव्हा एकमेकांना समजून घ्या माणस माणसापासून दुर गेलीत तर माणसा़ंची काय अवस्था होईल.घर असेल पण संवाद नसेल तर अशा जगण्याला अर्थ नाही तेव्हा बोला भरभरून ब़ोला संवादच माणसाचा प्राणवायू आहे.ज्या दिवशी संवाद संपेल त्या दिवशी समजायचं की माणसाचं माणूसपण राहिलं नाही. मोबाईलच्या दुनियेत आईवडीलांची जबाबदारी पार मोठी आहे. परिणामकारक आहे कारण मुलांचं वागणं,सवयी, संवादाची पद्धत ही मुख्यतःघरातूनच शिकवली जाते मोबाईलचा वापर संपूर्ण थांबवणं शक्य नाही,पण ते कमी करून माणूसपण जपणं ही आईवडीलांची मोठी जबाबदारी आहे.मुलांवर ओरडण्याधी,आईवडीलांनी आधी स्वतःच आत्मपरीक्षण करावं की आपण किती मोबाईलच्या आहारी आहोत.कामाच्या वेळी मोबाईल वापरा ना,पण सर्वकाही मोबाईलच आहे असं गृहीत धरून ठेवलं तर आपल्या माणसांमधे अंत़र वाढणारच ना कारण मुलं जेव्हा आई वडीलांशी बोलतात तेव्हा आईवडील मोबाईल मधे व्यस्त असतात,तेव्हा मुलं बोलणं कमी आणि पाहणं जास्त शिकतात म्हणून आई वडीलांनी स्वतःहून मर्यादा घालणं फार गरजेचं आहे त्यासाठी कुटुंबाला वेळ’ द्या रात्रीच्या वेळी जेवताना,मोबाईल बाजूला ठेवून फक्त संवाद करता करता जेवन करा एकमेकांना काहीतरी सांगा,जुन्या आठवणी शेअर करा,टीव्ही,मोबाईल शिवाय वेळ घालवला म्हणजे मुलांना समजेल की मोबाईल शिवायही वेळ मजेशीर आणि जवळीक निर्माण करणारा होवू शकते.स्वतःही आणि मुलांनाही खेळायला,वाचायला,चित्र काढायला, स्वयंपाकात मदतीला बाहेर भटकायला प्रेरित करा. मोबाईलच्या बाहेरही आयुष्य आहे,हे ते प्रत्यक्ष कृतीतून शिकतील.मुलं का सतत मोबाईलवर असतात यामागे एक मानसिक गरज असते ती म्हणजे संवादाची,सन्मानाची,ती गरज पूर्ण केली,तर मोबाईलची गरज आपोआप कमी होईल.मोबाईलचा पूर्ण निषेध करणे योग्य नाही पण त्याऐवजी जगात काय चांगलं आहे काय नाही सोशल मीडियाचे फायदे,तोटे सायबर सेफ्टी हे शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे.अस मला वाटत कारण काय असतं की मुलांना प्रेम,विश्वास आणि सुरक्षिततेची भावना मिळाली,तर मोबाईलपेक्षा माणूस अधीक जवळचा वाटू लागेल.आणि संवाद करायला त्यांना आपोआप आवडू लागेल.शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांच लहानपण परत येणार नाही मोबाईल मात्र रोज नवीन येतील तंत्रज्ञानासोबत चालणं गरजेचं आहे,पण माणसात राहणं,संवादात जगणं ते जास्त गरजेचं आहे.समज फक्त मुलांनाच देऊन चालणार नाही तर घरातल्या प्रत्येक मोठ्या माणसांनी ही समजून घेतल पाहिजे मोबाईल लहान मुलच नाही तर मोठी माणसंही वापरतात हे विसरायला नको.कारण मोबाईलच्या जगात संवाद हरवला आहे म्हणून त्या संवादाला मरू देऊ नका.जर संवाद मेला तर मग उरतं काय?तेव्हा संवादाला बोलत करा म्हणजे माणसा माणसात अंतर वाढणार नाही माणूस माणसापासून दुर राहणार नाही.कारण या मोबाईल मुळे काय झालंय की संवाद आणि संवेदना मधला स गायब झाल्यामुळे वाद आणि वेदना उरल्या सारखं वाटतय.तेव्हा आयुष्यात फक्त मोबाईलसाठी वाद नको म्हणून आपल्या माणसांसाठी संवाद करणं खूप गरजेच आहे.काय!
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसूमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
