You are currently viewing “माय मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची” – राजेंद्र घावटे

“माय मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची” – राजेंद्र घावटे

पिंपरी :

माय मराठीला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता या निकषावर अभिजात दर्जा मिळाला आहे. व्यवहारात आपाल्या भाषेचा जाणीवपूर्वक वापर करून तिचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे.

संत तुकाराम नगर पिंपरी येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी “मराठी भाषा काल-आज-उद्या” या विषयावर व्याख्यानपुष्प गुंफताना ते बोलत होते.

जेष्ठ साहित्यिक मा. सुरेश कंक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मानवी हक्क व जागृती चे अध्यक्ष अण्णा जोगदंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य संयोजक केंद्रप्रमुख अनिल कारळे यांनी प्रास्ताविक केले.

श्री. घावटे पुढे म्हणाले की, ” ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा मुकुट ल्यालेली , तुकोबांच्या गाथेचा मळवट भाळी भरलेली, नामदेवांच्या कीर्तनाचा शालू पांघरलेली , एकनाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली अशी ही माय मराठी ! सकल संतांच्या पंक्तीने अलंकृत आहे. राष्ट्रपुरुष व समाजधुरीण यांच्या कार्याचा वारसा जोपासणारी आणि शिवरायांच्या स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन ती डौललदारपणे वर्षानुवर्ष भारत वर्षामध्ये वावरते आहे.

मराठी भाषेला शासनदरबारी अभिजात दर्जा मिळणं ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. बारा कोटी लोकांची मातृभाषा असणारी मराठी ही खऱ्या अर्थाने एक समृद्ध भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा प्रसार आणि प्रचार जास्त जोमाने होईल. आपण व्यवहारात मराठी चा वापर आवर्जून केलाच पाहिजे. मराठी भाषा जोपासत ती वृद्धिंगत करण्याचा संकल्प अभिजात भाषा दिनाच्या निमित्ताने करू यात !”

आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरेश कंक म्हणाले की, “अभिजात दर्जा मिळण्यासाठी शहरातील साहित्यिकांनी लक्षणिक उपोषण केले, पथनाट्यातुन जनजागृती केली . सर्वांच्या प्रयत्नामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे सार्थ अभिमान आहे.”

प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड म्हणाले की “भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हजारो वर्षाची परंपरा असावी लागते. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे जागतिक स्तरावर भाषेचे महत्त्व वाढले आहे. प्राचीनता, स्वयंभूपना अशा सर्व निकषांमध्ये मराठी भाषा बसली आहे.”

सुरेखा मोरे, संगीता क्षीरसागर, शैलजा आवडे, प्रतिभा गोसावी, सोनल बोबले, ऐश्वर्या गायकवाड, निशा भोसले, जयश्री आडसूळ, पल्लवी डावकर यांनी संयोजन केले.

केंद्राचालक अनिल कारळे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा