मंगेश लोके यांची हकालपट्टी; नंदकुमार शिंदे यांची तालुका प्रमुखपदी निवड
वैभववाडी / प्रतिनिधी :
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नंदकुमार शिंदे यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मंगेश लोके हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. याशिवाय पंचायत समिती सदस्यपदासह अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या अपयशासोबतच लोके यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला. तरीदेखील पक्षाने त्यांना संधी दिली होती. परंतु नंतर पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी अनेकदा भाजपात प्रवेश केला आणि शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या पार्श्वभूमीवर शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मंगेश लोके यांची हकालपट्टी जाहीर करत नवे तालुका प्रमुख म्हणून नंदकुमार शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
