You are currently viewing तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन २०२५ अमरावती

तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन २०२५ अमरावती

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे आयोजन…

अमरावती :

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने” तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन” दि. पाच आणि सहा ऑक्टोबर 2025 ला अमरावती कांचन रिसॉर्ट अमरावती येथे घेण्याचे ठरलेले आहे. आदिवासी साहित्याच्या अभ्यासक आणि साहित्यिक मा. उषाकिरण आत्राम या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या असून सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, डॉ.मनीषा यमसनवार नागपूर यांच्या शुभहस्ते उदघाटन होणार आहे.

अमरावतीच्या फर्स्ट लेडी गव्हर्नर मा. कमलताई गवई विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर विदर्भाच्या बाहेरून पुणे येथून सुप्रसिद्ध साहित्यिक मा.ज्योत्स्नाताई चांदगुडे या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत. अमरावती येथील सुप्रसिद्ध उद्योजिका कांचनताई उल्हे यांनी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले आहे. नवीन अध्यक्षांना सूत्रे बहाल करण्याकरता पूर्व अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार माननीय विजयाताई ब्राह्मणकर, नागपूर मंचावर उपस्थित राहणार आहेत.

दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्यानंतरचे हे पहिलेच वर्ष..! त्यामुळे या सप्ताहात हे साहित्य संमेलन आम्ही जाणीवपूर्वक आयोजित केलेले असून “अभिजात मराठी” ही आमच्या साहित्य संमेलनाची थीम आहे.

ग्रंथदिंडीने सुरुवात होणारे साहित्य संमेलन दिनांक पाच आणि सहा ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसात दहा सत्रांमध्ये संपन्न होणार आहे. ज्यामध्ये मराठी भाषेच्या अभिजात समृद्धी मध्ये वैदर्भीय लेखिकांचे योगदान या विषयावरील परिसंवादा सह “बदलती जीवनशैली” या विषयावरील परिसंवाद अशा दोन परीसंवादांचे आयोजन केलेले आहे. उद्घाटन सत्रा नंतर अभिरूप न्यायालय सत्र, आयोजित केलेले असून दोन दिवसांमध्ये दोन कवी संमेलने, गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रम सत्र, कथाकथन सत्र, समारोप सत्र संपन्न होणार आहे.

या प्रसंगी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित “विदर्भ शलाका २०२५” या विशेषांकाचे उद्घाटन सत्रात प्रकाशन होणार आहे. तसेच या साहित्य संमेलनात सहभागी कवयित्रींच्या अभिजात मराठी ला समर्पित कवितांचा “अक्षरवलय” हा प्रातिनिधिक संग्रह समग्र प्रकाशन, तुळजापूर यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. तसेच काही वैदर्भीय लेखिकांच्या स्वलिखित काव्यसंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रहांचे तसेच गीतांचे प्रकाशन याप्रसंगी होणार आहे.

विविध क्षेत्रांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वैदर्भीय स्त्री रत्नांचा “विदर्भ रत्न स्त्रीरत्न” पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

ज्यामध्ये माननीय रजनीदीदी राठी, माननीय प्रभाताई आवारे, माननीय रजिया सुलतान, माननीय कमलताई रहाटे आणिआंतरराष्ट्रीय ख्यातीची ऑलिम्पिकपटू प्राची पारखी यांचा समावेश आहे.

मराठी चित्रपट महामंडळ मुंबईच्या माजी संचालक मा.माधुरीताई आशिरगडे समारोप सत्राला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या असून मा.सुदर्शन गांग आणि मा. वासंतीताई मंगरोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच आद. गोविंदजी कासट, डॉ. दिलीप सिंह खांबरे, डॉ. सतीश तराळ तसेच मा. विलास मराठे आणि मा. नरेशचंद्र काठोळे या अमरावतीकर बंधूंचा आम्ही सन्मान करणार आहोत.

मोजके, कमी लेखन असलेली जिच्या मागे आर्थिक पाठबळ नाही, घरातून पाठिंबा नाही अशा लिहित्या महिला समाजात पुढे येण्यास फार उशीर होतो. अनेकदा अशा भगिनी काळाच्या पडद्या मागे संपून ही जातात. म्हणून नि:स्वार्थ भावनेने थोडसं परंतु दमदार लिहिणाऱ्या कवयित्री, लेखिका समाजापुढे आणणे हा आमच्या या आयोजनाचा उद्देश आहे. आमच्या ह्या हिरकण्या तळपत समाजापुढे याव्या आणि या विदर्भाचा कॅनवास वैदर्भीय लेखिकांच्या तेजाने तळपत राहावा याच अपेक्षेने ही चळवळ उभे राहिलेली आहे.

अकोला येथील पहिले, नागपूर येथील दुसरे, विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाप्रमाणेच सध्या सर्व लेखिकांमध्ये असलेल्या उत्साहामुळे अमरावती येथे होऊ घातलेले हे तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन सुद्धा यशस्वी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान च्या अध्यक्ष विजया मारोतकर, सचिव मंगेश बाबसे, कोषाध्यक्ष डॉ. माधव शोभणे आणि सर्व पदाधिकारी या साहित्य संमेलनाच्या यशस्वीते करिता झटत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा