You are currently viewing गीता फोगट

गीता फोगट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गीता फोगट*

 

समाजातील बंधनांना डावलून एखादी ध्येयाने झपाटलेली मुलगी कुस्तीच्या मैदानात पाय ठेवते, समाज तिला नावं ठेवतो, कुस्ती खेळणारी मुलगी म्हणून तिची निर्भत्सना होते, तिला प्रथा परंपरा आणि रीतीरिवाजांचे, स्त्रीत्वाचे जुनाट दाखले देऊन हिणवले जाते. कुस्तीपासून तिला परावर्तित करण्यासाठी प्रचंड रेटा लावला जातो पण ही मुलगी मात्र कशानेही मागे हटत नाही आणि तिच्या महत्त्वाकांक्षापूर्तीवर ठाम राहते आणि एक दिवस देशाची *स्टार रेसलर* बनते. देशाचा अभिमान वाढवते आणि “महिला काय नाही करू शकत?” याचा प्रस्थापित समाजाला मजबूत दाखला देते.

 

ही प्रेरणादायी कथा आहे कुस्तीपटू *गीता फोगट* हिची.

 

२०१२ च्या लंडन ऑलिंपिक मध्ये भाग घेऊन तिने क्रीडा क्षेत्रात इतिहास घडवला. हरियाणाची राजधानी चंदीगड पासून दहा किलोमीटर असलेल्या *बलाली* या गावात तिचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षापासून तिने घरीच तयार केलेल्या आखाड्यात कुस्तीचे धडे परिश्रम पूर्वक गिरविले. गीताचे वडील महावीरसिंह यांनी आपली कन्या गीता हिच्यामधले हे कुस्ती क्रीडा गुण हेरले आणि एक दिवस ‘गीता देशासाठी गर्व कन्या ठरेल’ याची त्यांना खात्री वाटली. ते स्वतः एक नावाजलेले मल्ल आहेत. त्यांनी राज्यस्तरावर अनेक स्पर्धा गाजविल्या आणि तेच गीताचे प्रशिक्षक झाले. वडील आणि गुरु या दोन्ही भूमिकेत त्यांनी गीताला मार्गदर्शन केले.

 

राष्ट्रकुल खेळामध्ये गीताने सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिच्या आग्रहाखातर महावीर सिंह यांनी तिला पटियाला येथील *एनआयएस* येथे प्रशिक्षणासाठी पाठवले.

 

भारताकडून ऑलिंपिक साठी पात्र ठरलेली गीता ही पहिली महिला खेळाडू ठरली होती. *गीता फोगटला* पाच बहिणी आहेत आणि विशेष म्हणजे त्या सर्वच कुस्तीपटू आहेत.

 

फोगट बहिणींच्या यशाने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः हरियाणा मध्ये प्रचलित असलेल्या लिंग असमानता, स्त्री भ्रूणहत्या आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांच्या प्रकाशात १९९०साली सोनिका आणि दीपिका पाल नावाच्या महिलांनी कुस्तीमध्ये सहभागी होण्यासाठी मुलींना प्रोत्साहित करण्याचे बीज पेरले आणि या फोगट भगिनींनी या क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवली.

 

२०१६मध्ये गीता फोगटने पवन कुमारशी लग्न केले. एका कुस्ती स्पर्धेत त्यांची भेट झाली होती. पवन कुमार हाही पदक विजेता कुस्तीपटू आहे. त्यांना अर्जुन सरोहा नावाचा मुलगा आहे. कदाचित भविष्यातला आणखी एक कुस्तीपटू, देशाचा तारा तो ठरू शकतो.

 

२०१६ मध्ये *गीता फोगट* आणि तिच्या बहिणींवर आधारित *दंगल* नावाचा चित्रपट अतिशय गाजला होता.

 

मध्यंतरी कुस्ती क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि लैंगिक छळाच्या बातम्या वाचून मन खूप सुन्न झाले होते पण कुठल्याही प्रकारच्या समस्यांना युद्ध पातळीवर आणि शौर्याने तोंड देणाऱ्या या महिला *वीरबाला* ठरल्या. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा तेव्हा पुन्हा एकदा प्रत्ययास आला होता पण या नारी शक्तीने तो ठेचून काढला हे विशेष. नवरात्रीच्या निमित्ताने नारीशक्तीचा गौरव होत असताना *गीता फोगट* या सक्षम कुस्ती क्रीडापटूस मानाची वंदना! धन्यवाद!

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा