*सेवा पंधरवडा निमित्त तुळस येथे विद्यार्थी सन्मान सोहळा दिमाखात संपन्न*
*वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांचे संयुक्त आयोजन*
वेंगुर्ले
“विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे आपल्या भविष्यास दिलेला सलाम आहे” या विचाराला प्रत्यक्ष आकार देत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तुळस आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा निमित्त विद्यार्थी सन्मान सोहळा तुळस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण ६८ गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवा पंधरवडा अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई होते. याशिवाय वेताळ प्रतिष्ठानाचे सचिव डॉ. सचिन परुळकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रथमेश सावंत, उद्योजक सुधीर झांट्ये, मुख्याध्यापक कोल्हे सर, सर्पमित्र महेश राऊळ, निवृत्त शिक्षक अजित राऊळ सर , सदगुरू सावंत, विलास परब यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले –
“विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक ज्ञान नको, तर सामाजिक जाण आणि पर्यावरण संवर्धनाची भावना आवश्यक आहे. या सन्मानामुळे त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण होईल.”
वेताळ प्रतिष्ठानाचे डॉ. सचिन परुळकर म्हणाले –
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवणे हे आमचे ध्येय आहे.”
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रथमेश सावंत म्हणाले –
“गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले की तेच उद्याचे नेते, वैज्ञानिक, कलाकार आणि समाजसेवक घडतात. हा सोहळा मुलांच्या मेहनतीला दिलेला खरा मान आहे.”
या कार्यक्रमात क्रीडा मार्गदर्शक बबन घोडे पाटील यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कोल्हे सर यांनी केले, सूत्रसंचालन संदीप तुळसकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन बबन घोडे पाटील यांनी मानले.

