You are currently viewing वेर्ले-शिरशिंगेत शेतकरी संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

वेर्ले-शिरशिंगेत शेतकरी संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ निराकरणाचे आश्वासन; सिंधुदुर्ग बँकेकडून दुग्धव्यवसायासाठी कर्ज व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध

शहरातील नोकऱ्यांपेक्षा शेती व शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य द्यावे – मनीष दळवी

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले व शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळावे उत्साहात पार पडले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व संचालक रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याचा उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि बँकेच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करणे हा होता.

संचालक श्री. रवींद्र मडगावकर यांनी सर्व शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.

सरकारच्या आरोग्य व कृषी खात्याच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना आयुष्मान योजना, कृषी सबसिडी, तसेच नव्या कृषी योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेच्या डिजिटल सेवा, बचत व कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना बँकेच्या एटीएम कार्डचे वितरणही करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात श्री. मनीष दळवी यांनी तरुण शेतकऱ्यांना शेती व दुग्धव्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात सध्या दोन लाख लिटर दुधाची गरज असताना उत्पादन फक्त एक लाख लिटर असल्याने, दुग्धव्यवसायात संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. या क्षेत्रासाठी कर्ज व प्रशिक्षणाची सुविधा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत दर्जेदार बँकिंग सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेने ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय गाठला असून याचे श्रेय जिल्ह्यातील ग्राहकांच्या विश्वासाला जाते,” असेही श्री. दळवी यांनी स्पष्ट केले.

वेर्ले येथील मेळाव्यात सैनिक बँकेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सीईओ सुनील राऊळ, वेर्ले विकास सोसायटीचे चेअरमन विजय राऊळ, सरपंच सौ. रुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन शंकर पावसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भगवान राणे यांनी केले.

शिरशिंगे येथील मेळाव्यात सरपंच दीपक राऊळ, सोसायटीचे चेअरमन दिलीप राणे, व्हाईस चेअरमन रघुनाथ परब, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नारायण राऊळ, सुरेश शिर्के, पांडुरंग राऊळ, गणपत राणे, प्रशांत देसाई तसेच सोसायटीचे सर्व संचालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा