You are currently viewing हे शारदे….

हे शारदे….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*हे शारदे….*

 

ज्ञान अन् विद्येची देवता….देवी शारदा..

भगवान श्री गणेशाच्या नंतर वंदन करतात ती विश्वमोहिनी माता शारदा…

सरस्वतीचे रूप म्हणून ज्ञात आहेस तू.. देवी सरस्वती भारतीय संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ देवता…आणि तिचे रूप म्हणून तुझेही अनन्यसाधारण महत्त्व आहे…!

सोनेरी चांदण्या ल्यालेली भरजरी सोनेरी किनार लावलेली शुभ्र सफेद साडी अन् मोरपंखी कमरपट्टा…किती मोहक दिसतो हा वस्त्रालंकार…!

सोनेरी जरीची किनार असलेलं पोलकं शुभ्र सफेद साडीवर फार उठून दिसते….जणू हिरेजडित दागिण्यात हिरवा पाचू चमकावा तसाच….!

हिरेजडित सुवर्णलंकार कंठाची शोभा वाढवितात…त्या सुवर्णलंकारांना मोत्यांच्या माळेचा चढलेला साज तर सौंदर्यात आणखीच भर टाकतो…

मनगटी हिरेजडित बांगड्या वर मोत्यांची किनार…मोत्यांनी सजलेला बाजूबंध… अन् डोईवर हिरेजडित स्वर्ण मुकुट…चंद्रालाही डाग असतो गं…. पण त्याहूनही किती प्रसन्न भासते गं तुझं मुखकमल…!

मुखावर खुललेले प्रसन्न भाव पाहताच मन आनंदित होतं..कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं…. यत्किंचितही न ढळणारी प्रेममय नजर खरंच आपलीशी करते गं…!

तुझ्या कोमल हाती धरलेली वीणा… सूर छेडणारी नाजूक बोटे…जेव्हा झंकारतात तेव्हा काव्यरूपी शब्दब्रम्हाचे दर्शन घडते… तुझ्या विणेतून निघणाऱ्या झंकारांमधून आम्हांस…तू विद्येचे महत्त्व सांगून जातेस…!

हे शारदे, तू वाणीची देवता…नाविन्य, शब्दसंपदा व लावण्यातून साहित्याची, काव्याची निर्मिती होऊन आपल्या वाणीचे मनोहर रूप युगानुयुगे तू प्रकट करतेस…. अन् मानव जीवनात प्रसन्न चांदण्याची पखरण करतेस गं…!

समर्थ रामदासांनीही आपल्या शारदा स्तवनात सांगितलंय…

शारदा तू शब्दमूळ वाग्देवता असून बहुवेशाने नटलेली परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी चार अवस्था रुपात परब्रम्हसुर्याची शोभा आहेस…

हे शारदे, तू अरण्यात काळ्या खडकावर विराजित असून…तुझ्या सभोवार…पाऊलांजवळ निळ्याशार रंगाचे, डोईवर तुरा असलेले आणि आपले मोरपंखी हिरवे पंख फुलवून नृत्य आविष्कार सादर करणारे मयूर विहार करत आहेत… जणू तुझ्या विणेतून निघणाऱ्या मधुर स्वरांवर ते बेधुंद होऊन नाचण्याची प्रतिक्षाच करत आहेत……

अवकाशातील फिक्कट निळसर रंगाची साडी नेसून विहार करणारी स्वच्छ, निर्मळ सरिता तुझ्या बाजूनेच वाहते आहे…जणू तिचं निर्मळ पाणी तुझ्या चरणांना स्पर्श करून पावन होत असेल…

तू बैसलेली गुलाबी बैठक देखील तुझ्या बसण्याने पवित्र झाली….तुझ्या सभोवार हिरवा निसर्ग काळ्या पांढऱ्या ढगांमधून डोकावून पाहणाऱ्या रवीच्या तेजाने उजळून गेला आहे…तुझ्या मुकुटावरील मोरपीस देखील त्या हिरव्या निसर्गाशी स्पर्धा करतेय असंच भासतेय गं…!

हे शारदे….. छोटी छोटी, बालके, शैशव, कुमारवय, व तारुण्य असल्यापासून तुझी उपासना…आराधना करतात…

कारण, विद्यादेवी तुझा प्रभाव…तुझे सामर्थ्य आज आम्हांस मान्य झाले आहे …तू आमच्यावर प्रसन्न झालीस तर आम्हांस काहीही कमी पडणार नाही…पण तू जर का पाठ फिरवलीस….तर त्यांचे काय होईल हे कोणीही न जाणो…!

हे शारदे…तू कविजनांची तर प्राणप्रिय आहेस…आवडती आहेस…शब्दांची मोहिनी घालणारी शुभ्र ज्योत्स्ना आहेस… त्यांनी तुझे वर्णन करताना किती सुंदर शब्द वापरले आहेत…तुझा गोरा वर्ण अन् शुभ्र साडीचे वर्णन करताना कवींच्या वाणीला भरते येते… तुझा शुभ्र वर्ण पाहून मोहक फुलणारी सुगंधित शुभ्र मोगरा, जाई, जुई….स्वतः जळून गंध पसरविणारा…जंतूंचा नाश करणारा कर्पूराची… हिमाच्छादित डोंगरांची आठवण येते गं…!

हे शारदे तुझा धवल वर्ण ..धवल वस्त्र हे मांगल्याचे प्रतीक आहे…तुझ्या आवडीच्या धवल रंगामुळे अनेकांनी धवल रंगाला पसंती दिली आहे… तुझा श्वेत रंग निर्मलतेचा आणि प्रसन्नतेचा प्रतीक बनला आहे गं…!

हे शारदे, आम्ही आमच्या वह्या पुस्तकांमधूनही तुझंच रूप पाहतो…विजयादशमीच्या दिवशी तर तुझं प्रतिकात्मक रूप पाटीवर खडूच्या सहाय्याने रेखाटतो…आणि पुष्प कमल वाहून तुझं पूजन देखील करतो…तू दिलेली विद्या आम्ही सदैव दुसऱ्यांना वाटत असतो….असं म्हणतात ना “दिल्याने आपले काही कमी होत नाही…तर ज्ञान, विद्या वाढतेच…!”

 

*सुवक्षोजकुंभां सुधापूर्णकुंभां*

 

संपूर्ण विश्वाच्या पोषणासाठी आई शारदेच्या स्तनमंडलात अमृत भरलेलं आहे…सकल विश्वाला ज्ञानामृत पाजून तृप्त करणारी देवता शारदा…!

हे शारदे, तुझ्या अंगणी सर्वच सारखे असतात गं….!

परंतु काहीजण आपलं महत्व वाढविण्यासाठी तुझी अवहेलना करतात, तेव्हा तुला सुद्धा वाईट वाटत असेलच… नाही का गं?

तुझ्याकडून मिळालेल्या विद्येचा उपयोग जनहितार्थ करून सदैव तुझा ऋणी राहण्यातच मला धन्यता वाटते गं…!

 

*हस्त तुझ्या कृपेचा*

*राहो माते माझ्या शिरी*

*प्रसन्न वदने सदैव शारदे*

*नम्रपणे तुझीच सेवा करी*

 

हे शारदे, केवळ एकच मागणं आहे गं तुझ्याकडे…”जोवर मी तुझी निस्सीम भक्ती करतो, तोपर्यंत तुझा कृपाशीर्वाद माझ्या डोईवर असू देत…!

 

©【दीपी】

दीपक पटेकर, सुंदरवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा