भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी म्हणजे १९४६ साली स्थापन झालेले सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे शिक्षणाची ज्ञानगंगा..!
सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अकरा महनीय व्यक्तींनी या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची नावे आदराने घ्यावी लागतील असे माजी आमदार स्व.प्रतापराव भोसले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.बाळासाहेब सावंत, माजी मंत्री स्व.भाईसाहेब सावंत आदी होत. या संस्थेचे अकरावे अध्यक्ष म्हणून स्व.विकासभाईंनी तब्बल ३४ वर्षाहून अधिक काळ संस्थेचा सर्व कार्यभार आपल्या खांदावर यशस्वीपणे वाहिला होता. गेल्या काही वर्षात तर विकासभाईनी या संस्थेला ऊर्जितावस्था आणली आणि राणी पार्वती देवी हायस्कूलची जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
स्व.विकासभाईंच्या अकाली निधनानंतर संस्थेची धुरा त्यांचे चिरंजीव विक्रांत सावंत यांच्यावर येईल याची कल्पना होतीच आणि झालेही तसेच. विकासभाईंवर जसे तरूणपणी आघात झाले तसेच विक्रांतवर देखील झाले परंतु सर्व दुःख गिळून जशी विकासभाईंनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले तसेच किंबहुना त्यापेक्षा जोमात काम करून संस्थेला गरुडझेप घेण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अवघ्या ३७ व्या वर्षी विक्रांतवर आलेली आहे. शांतिनिकेतन इंग्लिश मिडियमचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते काम पाहत आहेत. त्यामुळे विकासभाईंनी निर्माण केलेले हे शैक्षणिक कार्य त्याच विश्वासाने जपण्याची आणि वृध्दींगत करण्यासाठी तरुण शिक्षणमहर्षी म्हणून नक्कीच विक्रांत ती जबाबदारी पेलतील याची खात्री आहे.
स्व.विकासभाईंनी शाळा हाच आपला प्राधान्यक्रम म्हणून जपलेला होता. शाळा म्हणजेच जणू त्यांचा श्वास होता. दिवसरात्र ते शाळेच्या प्रगतीसाठी कार्यरत होते. राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली परंतु बदलत्या राजकारणात अनेकांनी संधीचा फायदा घेत यशस्वी राजकारणी बनले परंतु विकासभाई त्या सर्वांपासून वेगळे गणले गेले. ते शेवटपर्यंत एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते म्हणून राहिले. विक्रांतने मात्र याबाबतीत आपली वेगळी दिशा निवडून शिवसेना पक्षात प्रवेश केला, सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. काही काळ राजकीय क्षेत्रात उमलता तारा म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले, स्व.भाईसाहेब सावंतांचा वारसदार म्हणून भावी आमदार म्हणूनही भाकीत केले गेले. पण अचानकपणे विक्रांत राजकारणापासून दूर गेलेले दिसले. पत्नीच्या अचानक निधनानंतर ते आपल्या दोन मुलांसोबत मुंबईत राहिले. परंतु अलीकडेच त्यांचे पिताश्री विकासभाईंच्या अचानक एक्झिटमुळे त्यांनी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा आपल्या खांदांवर घेतली आहे. जबाबदारी अंगावर पडली की ती यशस्वीपणे पेलण्याची सावंत घराण्याची परंपरा नक्कीच ते अबाधित ठेवतील आणि तरुण शिक्षणमहर्षी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली ओळख निर्माण करतील यात तिळमात्र शंका नाही…
