You are currently viewing वाघेरी गावात रावे अंतर्गत गांडुळखत प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक – शेतीस नवी दिशा

वाघेरी गावात रावे अंतर्गत गांडुळखत प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक – शेतीस नवी दिशा

वाघेरी गावात रावे अंतर्गत गांडुळखत प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक – शेतीस नवी दिशा

वाघेरी,
कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कृषीकन्या प्रिया नागरगोजे,कल्याणी पाटील प्रज्ञा देशमुख, प्रांजल भोसले, समृध्दी कुराडे,साईश्वरी निकम, लावण्या झोरे, प्रगती जाधव, नम्रता महामुनी ,निकिता कावनेकर , ज्योतिका कंदले यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत वाघेरी गावात गांडुळखत प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित केले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि खर्च कमी करणाऱ्या शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे, तसेच स्थानिक स्तरावर नैसर्गिक खत निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे हा होता.

प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थिनींनी गांडुळखत तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य – शेणखत, काडीकचरा, पानांचा कचरा, बायोगॅस स्लरी इत्यादी यांचा उपयोग करून खत तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली. योग्य आर्द्रता राखणे, तापमान नियंत्रण, गांडुळांची काळजी, तयार खताची छाननी आणि त्याचा शेतात वापर याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थिनींनी उपस्थित शेतकऱ्यांना गांडुळखताच्या उपयोगामुळे जमिनीची पोत सुधारते, सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढतात, पिकांचे उत्पादन वाढते आणि रसायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते, याची माहिती दिली. तसेच गांडुळखत तयार करताना स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी, गांडुळांचे संरक्षण कसे करावे आणि बाजारपेठेत त्याचा उपयोग करून आर्थिक लाभ कसा मिळवता येतो याबाबतही चर्चा झाली.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून प्रात्यक्षिकात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. काही शेतकऱ्यांनी गांडुळखत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक मदत मागितली, तर काहींनी आपल्या शेतात प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना माहितीपत्रके, संपर्क क्रमांक आणि मार्गदर्शक टिप्स दिल्या. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रात्यक्षिकांमुळे शेतीत नवीन तंत्रज्ञानाची ओळख होते, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग मिळतो, असे मत व्यक्त केले.

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष शेतीशी संपर्क साधण्याची संधी मिळाली, तर वाघेरी गावातील शेतकऱ्यांनाही पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेतीकडे वाटचाल करण्यासाठी नवा आधार मिळाला. या यशस्वी प्रात्यक्षिकामुळे पुढील काळात अधिक शेतकरी गांडुळखताचा वापर करून शेती उत्पादन वाढवतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ग्रामपातळीवरील कृषी विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. यासाठी सुहास रावराणे रेश्मा सुतार प्रशांत सुतार शुभम रावराणे प्रकाश सुतार, माधुरी कदम हे शेतकरी उपस्थित होते.

सर्वांचं सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा