सीबीएसई नॅशनल आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक पटकावून सिंधुदुर्गाचा देशभरात डंका
कणकवली :
सिंधुदुर्गातील १३ वर्षीय अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि कांस्यपदक पटकावत ऐतिहासिक यश मिळविले आहे. पंजाबमधील संगरूर येथे १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडली होती. देशभरातून अव्वल ठरलेले ७२ स्पर्धक यात सहभागी झाले होते. या कठीण स्पर्धेत अक्साने स्कोअरिंग राउंडमध्ये सुवर्णपदक तर इलिमिनेशन राउंडमध्ये कांस्यपदक पटकावत सिंधुदुर्गाचे नाव उज्ज्वल केले.
अक्सा कणकवलीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून ती मागील अडीच वर्षे सातारा येथे माजी सैनिक प्रवीण सावंत यांच्या दृष्टी अकादमीत आर्चरीचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या मेहनत, एकाग्रता आणि जिद्दीचे हे फळ असल्याचे तिच्या यशावरून स्पष्ट होते.
गुंटूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये अक्साने १६० पैकी १५५ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले होते. फायनलमध्ये टाय झाल्यानंतर ‘वन ॲरो फ्लाय राऊंड’मध्ये तिने दहाचा नेम साधत प्रतिस्पर्धीला मागे टाकले. त्याआधी तिने टॉप ३२ स्पर्धकांमध्येही प्रभावी कामगिरी केली होती. तसेच नादियाड (गुजरात) येथे झालेल्या नॅशनल स्कुल गेम्स ऑफ आर्चरी २०२४–२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तिच्या संघाला रौप्यपदक मिळवून दिले.
अक्सा हिने आत्तापर्यंतच्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या आर्चरी कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली आहेत. पुण्यात झालेल्या सीबीएसई राज्यस्तरीय स्पर्धेत पाचवी रँक मिळवत तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. नंतर दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहावी रँक मिळवली.
अक्साच्या यशामध्ये तिच्या प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मार्गदर्शन, तसेच तिचे पालक – प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुद्स्सर शिरगावकर आणि महिला स्वयंरोजगार उपक्रमातून प्रभावी कार्य करणाऱ्या तन्वीर शिरगावकर – यांचे मोठे योगदान आहे.
अक्सा हिचे स्वप्न म्हणजे ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकावणे. “मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते,” असे अक्सा विजयानंतर म्हणाली.
तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधुदुर्गासह राज्यभरातून क्रीडा वर्तुळात अक्साचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

