फोंडाघाट महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न !
फोंडाघाट
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे राष्ट्रीय व आंतरमहाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुंबई विद्यापीठ मुंबई व एस. एम. शेट्टी महाविद्यालय, पवई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या आंतरमहाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत टी. वाय. बी. कॉमच्या विद्यार्थिनी पल्लवी बाळकृष्ण शिंदे हिने ४८ किलो गटात कास्यपदक मिळवले, तर कोमल चंद्रकांत जोईल हिने ५२ किलो गटात महाविद्यालयास कास्यपदक मिळवून दिले.जागतिक स्तरावर ओळख असणाऱ्या कोकण जिओग्राफर्स असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने पर्यटन सप्ताह निमित्ताने, राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेचे आयोजन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोवा, पश्चिम बंगाल, केरळ आणि महाराष्ट्र इ राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये फोंडाघाट महाविद्यालयाने तीन गोल्ड मेडल, एक सिल्व्हर मेडल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या सतत मार्गदर्शनातून व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष रायबोले यांच्या परिश्रमातुन यश संपादित केले आहे.
कोरकू लोकनृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक (Gold Medal)
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक (Gold Medal) – कु. नीता दिलीप धुरी
पोस्टर मेकिंग स्पर्धा – प्रथम क्रमांक (Gold Medal) – कु. सपना संतोष रासम
निबंध स्पर्धा – द्वितीय क्रमांक (Silver Medal) – रॉयल कैतान बुटेलो
या पारितोषिक विजेत्यांचा महाविद्यालयात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात गौरव करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री रंजन नेरूरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत म्हटले की, “आयुष्यात यशाला फार महत्त्व आहे. ज्यावेळी अपयश वाटते, त्यावेळीच खरे प्रयत्न करून पुढे यश मिळवावे.” संस्थेचे चेअरमन महेश सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “कोणताही विजय लहान नसतो. मिळालेल्या प्रत्येक यशामध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच महाविद्यालयाचे योगदानही मोठे आहे. आज आपले सर्व विभाग प्रगती करत आहेत व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.” कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकण्यासाठी मेहनत, सातत्य आणि नेतृत्वगुण आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या कारकीर्दीत अशा स्पर्धांमधून आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास साधावा.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजाराम पाटील यांनी केले. डॉ. संतोष रायबोले यांनी आकर्षक सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ. राज ताडेराव यांनी मानले. मुलांच्या या यशा बद्दल संस्थेचे पदाधिकारी,संचालक, प्राचार्य तसेच प्राध्यापक वर्ग आणि ग्रामस्थां मधून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे

