वेंगुर्ला
आज जास्तीत जास्त विभक्त कुटुंबपद्धती अवलंबली जाते. त्यामुळे मुलांची – कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळून फावल्या वेळात काथ्या उद्योग होऊ शकतो.या उद्योगाला केंद्र सरकार व राज्य सरकार मदत करत असल्याने उद्योग करणे सोपे जाते. हा व्यवसाय पर्यावरणपूरक असल्याने बाजारपेठ उपलब्ध होत आहे. कोकणातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी काथ्या उद्योग हाच उत्तम पर्याय असून महिलांनी ॲडव्हान्स प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करावेत, असे प्रतिपादन क्वायर उद्योगाचे प्रणेते तथा कृषिभूषण एम.के.गावडे यांनी मळगाव येथे केले. क्वायर बोर्ड भारत सरकार सबरिझनल ऑफिस सिंधुदुर्ग यांच्यामार्फत क्वायर उद्योगाचे प्रणेते एम.के.गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी – मळगाव येथे अवेअरनेस प्रोग्रॅम संपन्न झाला,यावेळी एम.के.गावडे बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमास क्वायर बोर्ड ऑफिसर देविदास, सनराईझ क्वायर संस्थेच्या अध्यक्षा राखी कलंगुटकर, समाजसेविका गीता परब, श्रुती रेडकर, वर्षा मडगावकर, अनमोल क्लस्टर सीएलएफ मॅनेजर रुपाली गुडेकर, एमसीआर स्नेहल हरमलकर, लेखापाल वैभवी खडपकर, सीआरपी तथा ग्रा.पं. सदस्या निकिता बुगडे, सीआरपी रत्नप्रभा नाईक आदी उपस्थित होते. यावेळी एम.के. गावडे म्हणाले की, वेंगुर्लेतील महिला काथ्या संस्थेने आजपर्यंत दोन हजार पेक्षा जास्त महिलांना ट्रेनिंग दिले आहे. जिल्ह्यात केंद्रशासनाच्या मदतीने मालवण व सावंतवाडी येथील दोन क्लस्टर पूर्णत्वास जात असून लवकरच कार्यान्वित होतील. तसेच वेंगुर्ल्यातही राज्य शासनाच्या सहकार्याने एक भव्यदिव्य प्रकल्प उभा राहत आहे.त्याचा उपयोग महिलांनी आपल्या आत्मसन्मानासाठी करावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परमेश्वराच्या देणगीमुळे फार मोठी नैसर्गिक साधनसामुग्री आहे, त्यामुळे प्रक्रिया संस्थेला खूप मोठा वाव आहे. महिलांनी आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. काथ्या उद्योगासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन एम.के. क्वायर फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत, त्याचाही लाभ घ्यावा, असे यावेळी एम.के.गावडे म्हणाले.
क्वायर बोर्ड ऑफिसर देविदास यांनी क्वायर बोर्डाच्या सर्व योजनाबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच रूपाली गुडेकर यांनी बचत गट, बचत गटांच्या संधी यासंदर्भात मार्गदर्शन केले. गीता परब यांनी गेल्या दहा वर्षातील काथ्या प्रवासाबद्दल या उद्योगातील संधीबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती रेडकर व आभार वर्षा मडगावकर यांनी मानले.