*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट-३३*
*सरस्वतीपूजन*
“काय रे, आज शाळेत सरस्वतीपूजनाक जातलय मां? का नाय?” काकल्याने येता येताच मला प्रश्न विचारला. मी म्हटलं, “होय,जाणार आहे. मला निमंत्रण आहे.”
“ठराविक लोकांकाच् निमंत्रण आसा काय?” काकल्या बोललाच.
“असं काही नाही. गावातल्या सगळ्यांसाठीच निमंत्रण असतं. कुणीही जायला हरकत नाही.” मी समजावलं.
“तसा न्हय. तू म्हटलंस निमंत्रणाचा हून इचारलंय.” काकल्या.
मी चुकलो होतो बोलताना, म्हणून गप्प बसलो.
” सरस्वतीच्या दर्शनाक जातलंय, काय पोरांचे नाच बघूक जातलंय?” काकल्याने दुसरा प्रश्न विचारला.
“अरे मनोरंजनाच्या कार्यक्रमात खूप गर्दी असते. हाॅलमध्ये मुलांच्या आईवडीलांनाच जागा पुरत नाही. त्यात आपण कुठं? सध्या पावसात बाहेर मैदानात कार्यक्रम करू शकत नाही. आपण आपलं शाळेत सकाळी जाऊन यायचं झालं.” मी स्पष्ट केलं.
“बरा, सरस्वतीचो आणि नाचाचो संबंध काय?” काकल्या आपल्या मूळ पदावर आला.
“सरस्वतीच्या हाती वीणा आणि पुस्तक दोन्ही असतात. ती विद्या आणि कलेची देवता आहे. त्यामुळे मुलांचे कार्यक्रम ठेवण्यात काही गैर मानण्याचे कारण नाही. आपल्या विविध कला दाखवायला मुलांना ही एक संधी असते.” मी आपल्या परीने समजावत होतो.
“कला हुतल्यार, एखाद्या पोरग्यात चार कापूक येता, वाडवन बांधूक येता, माडार चढाक येता; ती कला दाखवक हरकत नाय काय?” काकल्याने अडचणीचा प्रश्न विचारला.
” खरंतर हरकत नाही, पण हे कसं दाखवायचं? तसंच बघणारे, समजून घेणारे लोक पण पाहिजेत. लोक या दिवशी करमणूकीच्या कार्यक्रमासाठी येतात.”मी.
“करमणूक हीच कला काय? गावात बरेच कलाकार आसत, त्येंचे सत्कार केल्या जाणा नाय? काय फक्त पक्षप्रवेशांचेच सत्कार होये.” काकल्या खवचट बोलला.
“अरे, कलावंत मुलांचे,पालकांचे सत्कार आपण करावेत. कोण तुला अडवतंय?” मी जरा जोरात बोललो.
“आमका फाटक्या माणसाक इचारता कोण? बरा, मूर्ती नायतर फोटो होयोच कित्या? पाटी-पेन्सिल, पुस्तक-वही हीच सरस्वती, ह्या पोरांका सांगतलांस केवा?” काकल्या प्रश्न विचारत राहिला, माझ्या उत्तराची वाट न बघता.
मी म्हटलं,” धर्म, रुढी, परंपरा असतात, त्या मागचा हेतू अबाधित ठेवून आपण काही केलं तरीही चालेल. कृतीपेक्षा त्यामागील विचार महत्वाचा असतो.”
“पून ह्या करूचा कोणी? आदला आमच्ये कपाळार ठेवन् जांतो जाता. हुशार धाकलो पळ काढता आणि गरीब वझा वोडता. हेनी संस्कृती टिकणा शक्य नाय. ” निर्वाणीचं बोलून काकल्या चालायला लागला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802

