पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यांचा मार्ग मोकळा
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी तब्बल २३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा निधी मंजूर केला.
जिल्ह्यातील पावसामुळे खड्डे पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची डागडुजी व देखभाल करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. याआधीच पालकमंत्री राणे यांनी कणकवली व सावंतवाडी कार्यकारी अभियंत्यांना अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अहवालावर आधारित हा निधी मंजूर झाला.
यंदा पंधरा मे पासून सुरू झालेला पाऊस तब्बल साडेचार महिने सातत्याने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, तब्बल ८८ रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळालेल्या या भरघोस निधीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा खड्डेमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
