*लेखक, कवी, पत्रकार ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम लेख*
*क्रिकेट आणि विरोधी पक्ष*
९ सप्टेंबर २०२५ पासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. ही सुरुवात झाल्यानंतर आपल्या देशातील सर्व विरोधी पक्षांनी, भाजपाच्या मोदी सरकारवर विरोधी टीका करायला सुरुवात केली. विरोधी पक्ष ९ सप्टेंबर पासून म्हणत आहेत. पाकिस्तान या देशाने कश्मीरच्या पहेलगाम भागात भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळीबार केला.
त्यात २७ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. त्या निषेधी हल्ल्याचा काही विचार न करता मोदी, शहा यांनी पाकिस्तान संघाशी खेळण्याचा निर्दयी निर्णय घेतला.
हे म्हणणे विरोधी पक्षांचे खरे असले तरीसुद्धा ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय संघ भावनेचा विचार करतो त्यावेळी अमुक एका देशाशी आम्ही खेळणार नाही. अशा प्रकारचा एकांगी निर्णय कुठलाही देश घेऊ शकत नाही. तसे करणे हा आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करणे असा होतो. त्यामुळे आपण संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकत नाही किंवा पाकिस्तानशी खेळणार नाही असे आपण म्हणू शकत नाही. तसे केले तर आंतरराष्ट्रीय देश समूह त्या देशाला कायमचे बाहेर ठेवेल. मग त्या देशाला आंतरराष्ट्रीय समूहाकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्या भारताला पाकिस्तान या देशाशी स्पर्धा म्हणून सामना खेळावा लागला. प्रत्येक देशाला अशाच प्रकारे खेळावे लागते. म्हणून मोदी शहा यांना भारताला पाकिस्तान सोबत खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
देशा देशात प्रत्येक संघ ज्याळी क्रिकेट दौरे करतात.
त्यावेळी आपण जरूर म्हणू शकतो, आम्हाला पाकिस्तानशी खेळायचे नाही. तो अधिकार आपल्या देशाला आहे. तसा तो प्रत्येक देशाला असतो. त्यात आंतरराष्ट्रीय नियम आड येत नाहीत.
आपण १९९० पासून पहात आलो आहे पाकिस्तान या देशाने आपल्याशी युद्ध पुकारले किंवा छुपा दहशतवादी हल्ला केला. अशावेळी आपल्या देशाने पाकिस्तानशी खेळणे कायम स्वरूपी नाकारले. या एका मुद्द्यावरून एकदा स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. दिल्लीत जाऊन क्रिकेट स्टेडियमची धावपट्टी उध्वस्त केली होती. मुंबईमध्ये तर पाकड्यांनी यायचेच नाही. अशी कडवी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात घेतली होती. त्या भूमिकेला भाजपाच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने विरोध केला नव्हता. काँग्रेसच्या यूपीए सरकारनेही विरोध केलाला नव्हता. मात्र आता आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आखाती देशात खेळली जात आहे. आपल्या देशाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. याचा अर्थ क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने पाकिस्तानी लोक आपल्या देशात येणार नाहीत. म्हणून आपण पाकिस्तानशी खेळलो तरी चालू शकेल. उलट यामुळे भारता विषयीचा आदर भाव आंतरराष्ट्रीय संघ भावनेत वाढणार आहे. ज्या पाकिस्तान्यांनी भारतीय नागरिकांवर हल्ला केला. त्याला प्रतिउत्तर देत भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांना संपूर्णतः उध्वस्त केले, तरी देखील भारताने आंतरराष्ट्रीय संघ भावनेला अनुसरून या स्पर्धेत पाकिस्तान बरोबर सामना खेळवला. हे आंतरराष्ट्रीय देशांनी पाहिल्यावर भारताची प्रतिमा उंचावणार आहे.
१९९० पासून जुन्या शिवसेना या पक्षाने नेहमीच पाकिस्तान विरोधी वातावरण देशात व महाराष्ट्रात कायम ठेवले आहे. त्यामुळे भारतात. कुठलाही पाकिस्तानी कलाकार येत नाही परंतु काही आंतरराष्ट्रीय कारणामुळे भारताला पाकिस्तान ह्या देशाशी क्रिकेट व इतर खेळांचे सामने खेळावे लागणार हे निश्चित आहे. अशावेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना या पक्षाने केवळ भारतीय भावना म्हणून विचार करू नये. काही वेळेला आंतरराष्ट्रीय नियमांचाही विचार करून निर्णय घ्यावा लागतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान – भारत समझोता करताना, क्रिकेट या खेळाला महत्व दिले होते. त्यावेळी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सत्तेत असताना भाजपाला विरोध केला होता. अशा परिस्थितीत अटलजींनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुसंवाद साधला होता. त्यातून पाकिस्तानने भारतात येऊन, क्रिकेट सामन्यांची मालिका खेळली होती. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला कपटीपणा दाखवल्याने अटलजींच्या परराष्ट्रीय धोरणाचा समझोता करार फाटला. मग मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या शिवसेनेने पाकिस्ताशी क्रिकेट सामने खेळायला आणि पाकिस्तानी कलाकारांच्या भारतातील कार्यक्रमांना विरोध केला. तो आजपर्यंत तसाच आहे. त्याला संपूर्ण भारतात कुणी नाकारले नाही. कारण पाकिस्तान हा देश उलट्या काळजाचाच आहे.
या सगळ्या घटनांचा विचार करून, विरोधी पक्षांनी पाकिस्तानला आपल्या देशात क्रिकेट सामने खेळण्याकरता विरोध करावा, पाकिस्तानच्या कलाकारांनाही विरोध करावा आणि त्या विरोधी भावनेचा सन्मान करून भारत सरकारने पाकिस्तान बरोबर कुठलेही परराष्ट्रीय संबंध ठेवू नयेत. हे भारत सरकारने केलेच पाहिजे. तरच मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना व शहीद झालेल्या जवानांच्या जीवाला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. याचा अर्थ असा नाही की भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून जागतिक देशांशी आपले नाते तोडावे. हे भारतीय परराष्ट्रीय धोरणात कदापी होऊ शकत नाही. म्हणून जिथे आंतरराष्ट्रीय संघ भावना आहे तिथे पाकिस्तान बरोबर आपल्याला क्रिकेट सामने खेळावेच लागतील. हे विरोधी पक्षांनी लक्षात ठेवावे. उगाच देशात वाद निर्माण करू नये.
ॲड.रुपेश पवार, ठाणे
9930852165

