ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
राज्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी, दुबार पेरणी इत्यादी कारणांमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाही. यामुळे शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचति राहु नये यासाठी शेतकरी स्तरावरुन पीक नोंदणीसाठी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलव्दारे 7/12 उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरु झालेली आहे. महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करुन खरीप व रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीव्दारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वत:च पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्याम काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक शेतकऱ्यांच्या मतदीसाठी उपलब्ध असतील अशी माहिती डी.डी.ई. तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे कळविले आहे.

