You are currently viewing ढगफुटी सदृष्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ढगफुटी सदृष्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ढगफुटी सदृष्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत;

नवरात्रोत्सवावर विरजण, बाजारपेठा ओस पडल्या

फोंडाघाट

काल दुपारीपासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले आहे. सलग १८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, बाजारपेठा, घरं, तसेच सार्वजनिक ठिकाणी पाण्याची चिखलवाढ झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पावसाचा फटका नवरात्री उत्सवावरही बसला आहे. शहरासह ग्रामीण भागात आयोजित गरबा-दांडिया कार्यक्रम रद्द किंवा स्थगित करण्यात आले असून, सांस्कृतिक वातावरणावर पावसाचे सावट पसरले आहे.

बाजारपेठेतही खरेदीदारांची वर्दळ कमी झाली असून व्यापाऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. याचा थेट आर्थिक परिणाम स्थानिक उद्योगधंद्यांवर होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे बळीराजाच्याही चिंता वाढल्या असून, काही भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे संकेत मिळत आहेत. काही शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, राज्यमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यात ठाण मांडले असून, प्रशासनाला सर्व पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे मदत कार्याला गती मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते अनेक ठिकाणी उखडले असून, खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन “रस्ते काँक्रीटचे करावेत आणि योग्य गटार व्यवस्था करण्यात यावी” अशी लेखी मागणी करणार आहेत.

या निवेदनाद्वारे प्रशासनाला नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे पोहोचवल्या जाणार असून, आगामी दिवसांत उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा