*ज्येष्ठ लेखक अरुण कुलकर्णी, नगर लिखित अप्रतिम लेख*
*ज्ञानमयी दुर्गा – सविताताई*
आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानाची महती फार गणली गेलेली आहे.ज्ञानाशिवाय मानवी जीवन रिक्त होय.प्राचीन काळापासून मानव ज्ञान प्राप्तीसाठी झगडतो आहे.
गुरुकुलात गुरु शिष्यांना अगाध ज्ञान प्राप्त करून देत होते.आज सुद्धा विद्यार्थी गुरु कडून ज्ञान प्राप्त करुन आपले व्यक्तिमत्व घडवत आहेत.
दिवसेंदिवस बदलत्या काळानुसार ज्ञानदानातही बदल होत गेले.आज पाहिले तर ज्ञानप्राप्तीत तंत्रज्ञानाने बाजी मारली आहे.माध्यमांद्वारे आज घरबसल्या आपण कोणत्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो.वर्तमानात तर कृत्रिम बुद्धिमत्तेने धुमाकूळ घातला आहे.
विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी शिक्षकांनी शिकविलेलेच विद्यार्थ्यांच्या पचणी पडते.माध्यमांद्वारे विपुल प्रमाणात माहिती मिळेल परंतु ज्ञान मिळलेच असे नव्हे.मग ज्ञानाचा खजिना शिक्षकच असल्याचे दिसून येते.कुंभार जसा ठोकून ठाकून घडा पक्का करतो तद्वत शिक्षकही विद्यार्थ्यांना
प्रेमाने, समजून सावरुन,अनुभवातून,क्रियाकलापातून, दृश्य स्वरूपातून ज्ञानाची बीजे रुजवण्याचे काम करतो .
विद्यार्थी पूर्णत्वाकडे येऊ लागला की मग तो ज्ञानाची शिदोरी त्याच्या बरोबर देतो.
*सविता पांडुरंग कुलकर्णी* नाशिक या अशाच एका विद्यार्थ्यांमध्ये ठासून ठोकून ज्ञान भरणाऱ्या एक ज्ञान दुर्गा आहेत.
सविता ताई १९१८ साली स्थापन झालेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन मराठी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून दाखल झाल्या.
उपक्रमशीलता व अभ्यासूवृत्तीने त्या अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय शिक्षिका ठरल्या. अभ्यासक्रमाबरोबरच त्या मुलांना अनुभव आधारित शिक्षण देऊ लागल्या.यामुळे विद्यार्थी प्रगतीने चमकू लागले व त्यांच्या बुद्धिमत्तेचा वाढ होऊ लागली.संचालक मंडळ व पालक वर्ग खुश झाला.सविताताईंनाही समाधानाचे हुंकार फुटू लागले व त्या झपाटल्यासारखे ज्ञान दानाचे कार्य करु लागल्या.
विद्या भारतीच्या माध्यमातून शिशु शिक्षणाचे भीष्म
श्री.सदाशीव ऊर्फ भाई उपाले यांच्या बरोबर सविता ताईंचा संपर्क आला सविता ताईंनी शिशु शिक्षणाचे अनेक प्रशिक्षण घेत शिशु शिक्षणाचे शिखर गाठण्याचा अहोरात्र प्रयत्न केला आणि आज सविता ताई प्रतिथयश शिशु शिक्षण तज्ञा म्हणून गणल्या जात आहेत.
पालक प्रबोधन,आजी आजोबा सम्मेलन,बालक महोत्सव, विद्यारंभ संस्कार,शून्य ते सहा वयोगट समुपदेशन,माता संवाद,बालक आहार मार्गदर्शन, नोकरी करणारे दोन्ही ही पालक मार्गदर्शन,बालकांचे मानसशास्त्र,शिक्षकांचे प्रबोधन अशा विविध विषयात सविता ताईंचा हातखंडा आहे.या विषयांवर त्या बोलतांना आपण त्यांच्या ज्ञानापुढे नतमस्तक होतो, मंत्रमुग्ध होतो.
सविता ताईंचे नाशिकमधील घर विद्या भारतीचे घर म्हणून ओळखले जाते.विद्या भारतीचा कोणीही कार्यकर्ता नाशिकला आल्यावर त्यांच्या घराचीच वाट धरतो.
एकदा त्यांच्या मुलीची नुकतीच डिलीव्हरी झाली होती आणि प्रांताची बैठक नाशिकला होती अशा अवस्थेत आम्ही सहा कार्यकर्ते त्यांच्या घरीच भोजनासाठी होतो व त्या व त्यांचे पतिराज पांडुरंगराव अत्यंत आदराने आमचे स्वागत करीत होते त्यादिवशी खरेच आम्हाला साक्षात पांडुरंग रुक्मिणीचे दर्शन घडले.
सदैव हसतमुख, ओसंडून वाहणारा उत्साह, विनम्र स्वभाव,प्रामाणिकता, उपक्रमशीलता, नवनवीन संकल्पनांचा महापूर, सूत्रसंचालनाची जादू,बोलण्यात मृदुता व गोडवा, अडचणींवर मात करून सुयोग्य मार्ग काढण्याची वृत्ती , सदैव ज्ञानपिपासू असणे हे सविता ताईंचे अलंकार आहेत.
कोणत्याही नवीन विषयावर अभ्यासपूर्ण चिंतन करुन ज्ञानप्राप्त करणे ही त्यांची अनोळखी ओळख. सविता ताई पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शिशु वाटिका सहसंयोजिका आहेत तसेच मुख्य प्रबंधिका आहेत.आज सेवानिवृत्तीनंतर ही सविता ताई कार्यमग्न आहेत.अश्या विद्या भारतीच्या ज्ञानमयी दुर्गेस सादर प्रणाम.
