मालवण :
डोंबिवली, मुंबई येथील कवी विजो (विजय जोशी) यांना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण पुरस्कृत ‘वाङ्मय पुरस्कार – २०२५’ घोषित झाला आहे. विजो यांच्या ‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ या पुस्तकाची दखल घेऊन कवी द्वारकानाथ शेंडे ‘मोक्षदा पुरस्कार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी चिपळूण इथे समारंभपूर्वक हा पुरस्कार विजो यांना प्रदान करण्यात येईल.
मूळ मालवण तालुक्यातील बागायत येथील असलेले विजय जोशी हे नामवंत कवी, गझलकार म्हणून ओळखले जातात. कवितेची आपली आवड जपताना त्यांनी अनेकाना वृत्तबद्ध कविता आणि गझलेचे धडे दिले आहेत. त्यामुळे त्यांना काव्यगुरू म्हणून ही ओळखले जाते. त्यांच्या “बाया” कवितेचा ५६ भाषांमध्ये अनुवादाचा जागतिक विक्रम झाला आहे. तसेच गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या त्यांच्या बालकविता संग्रहाला देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चिपळूण वाचन मंदिरच्या या नामांकित पुरस्काराबद्दल कवी विजो यांचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
