You are currently viewing आज नवरात्रीचा चौथा दिवस..

आज नवरात्रीचा चौथा दिवस..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र….चौथे पुष्प…*

 

*आज नवरात्रीचा चौथा दिवस….*

 

आज अशा एका स्त्री बद्दल आपण बोलणार आहोत ती म्हणजे भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर

 

श्रीमती कल्पना चावला.

 

स्त्रियांनी विविध क्षेत्रात बरीच मजल मारली होती.पण अंतराळ हे क्षेत्र अजून त्यांच्या टप्यात आले नव्हते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पुढे सरकत होतीच. पण अंतराळात जाणे ही कल्पना अजून कुणाच्या डोक्यात आली नव्हती….

 

पण ही कल्पना चावला जेव्हा आपल्या पित्यासमोर ही कल्पना मांडते, त्यावेळी प्रचंड विरोध तिला झेलायला लागला…घरच्यांनी तिला प्रखर विरोध दर्शविला…..पुढे कल्पना यांनी आपले स्वप्न कसे प्रत्यक्षात सत्यात उतरवले , ते वाखाणण्या सारखेच आहे…

 

एका स्त्रीची जिद्द जर तिने मनात आणले, तर कशी पूर्ण करु शकते, हे प्रत्येक मुलींनी लक्षात घ्यायला हवे. तिचा आदर्श समोर ठेवून भविष्य घडवले पाहिजे.

 

 

कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी करनाल, हरियाणा येथे झाला.  त्यांचे वडील बनारसी लाल चावला हे टायर उत्पादन कारखान्याचे मालक होते, तर आई संजोगता खरबंदा या गृहिणी होत्या. त्यांचे कुटुंब मूळचे पाकिस्तानातील गुजरानवाला येथील होते, परंतु भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान ते भारतात स्थलांतरित झाले. त्यांना दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार होता.

 

 

कल्पना यांना लहानपणापासूनच अंतराळ अभियांत्रिकीची आवड होती, परंतु वडिलांनी त्यांना वैद्य किंवा शिक्षिका होण्याचा सल्ला दिला होता.  करनाल येथील टागोर बाल निकेतन वरिष्ठ माध्यमिक शाळेतून कल्पना यांनी १९७६ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दयाल सिंग महाविद्यालयात प्राथमिक अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम घेतले. आणि मग आपल्या आवडीच्या क्षेत्रात चंदीगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९८२ मध्ये अंतराळ अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. इथे त्यांचा पहिला पडाव पूर्ण झाला. कल्पना या महाविद्यालयातील पहिल्या महिला विद्यार्थिनी होत्या.

 

 

१९८२ मध्ये कल्पना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. त्यांनी टेक्सास विद्यापीठ, आर्लिंग्टन येथून १९८४ मध्ये विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (एम.एस.) मिळवली, जिथे त्यांचा प्रबंध “Optimization of cross flow fan housing for airplane wing installation”

या विषयावर होता. तिथेच त्यांची भेट त्यांचे पती जीन-पिएर हॅरिसन यांच्याशी झाली आणि २ डिसेंबर १९८३ रोजी त्यांचा विवाह झाला.

 

त्यानंतर कोलोरॅडो विद्यापीठ, बोल्डर येथून १९८८ मध्ये त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली, ज्याचा प्रबंध “Computation of Dynamics and Control of Unsteady Vortical Flows”

या विषयावर होता. आणि त्या डॉक्टरेट मिळवून डॉ. कल्पना चावला झाल्या. या काळात त्यांनी उड्डाण प्रशिक्षण ही घेतले आणि व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला.कल्पना इथेच कौतुकास पात्र ठरतात.

 

 

१९८८ मध्ये कल्पना चावला यांनी नासाच्या एम्स संशोधन केंद्रात कार्य सुरू केले.  तिथे त्यांनी संगणकीय द्रव गतिशास्त्रावर संशोधन केले. विशेषतः उभ्या किंवा लहान उड्डाणक्षमता असलेल्या संकल्पनांवर.

 

१९९३ मध्ये त्या ओव्हरसेट मेथड्स या संस्थेत संशोधक आणि उपाध्यक्ष म्हणून रुजू झाल्या.

१९९० च्या दशकात त्या अमेरिकेच्या नागरिक बनल्या. आणि मग नंतर त्या डिसेंबर १९९४ मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवडल्या गेल्या. इथून त्यांना आपल्या ध्येयाचे शिखर जवळ आल्याचे लक्षात आले असावे.

 

१९ नोव्हेंबर १९९७ रोजी त्यांनी आजवर पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. त्यांची स्वप्नपूर्ती , त्यांची पहिली अंतराळ मोहीम STS-87 सुरू झाली.  त्या स्पेस शटल कोलंबिया यानावर मिशन विशेषज्ञ आणि यांत्रिक हाताच्या संचालक होत्या.

 

कल्पना यांनी “स्पार्टन” उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.

यावेळी ही मोहीम १५ दिवस १६ तास चालली आणि त्यांनी पृथ्वीभोवती २५२ प्रदक्षिणा पूर्ण केल्या.

 

एक भारतीय म्हणून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत होता. वर्तमानपत्रांच्या रकान्यात कल्पना चावला शिवाय दुसरे नाव नव्हते. त्यावेळी वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून कौतुकाचा आणि त्यांच्या आत्ता पर्यंतचा प्रवास ,त्यांनी घेतलेली खडतर मेहनत यावर भरभरून वहात होते. प्रत्येकाच्या तोंडी हाच विषय होता…भारतीयांचा अभिमान ओसंडून वहात होता.भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.

 

पहिली महिला अंतराळवीर म्हणून कोण कौतुक होते. आता महिला कशातही कमी नव्हत्या .आता अंतराळातही महिला जाऊ शकते, हे एका भारतीय महिलेनेच सिद्ध करून दाखवले. प्रत्येक भारतीय महिलेला अभिमानास्पद अशीही कल्पना चावला यांची मोहीम होती.

 

 

दुसरी मोहीम STS-107 ही १६ जानेवारी २००३ रोजी सुरू झाली. ही वैज्ञानिक संशोधन मोहीम होती, ज्यात कल्पना आणि त्यांच्या टीमने अनेक प्रयोग केले.  साऱ्या भारतीय आणि अमेरिकन नागरिकांचे या मोहिमेवर लक्ष्य होते.

परंतु १ फेब्रुवारी २००३ रोजी सात अंतराळवीरांना घेऊन यान पृथ्वीवर परतत असताना, टेक्सासच्या आकाशात ते नष्ट झाले आणि सातही अंतराळवीरांचा मृत्यू झाला. सारे भारतीय यावेळी टीव्हीवर प्रत्यक्ष लाईव्ह बघत होते…अंगावर काटा आणणारा प्रसंग होता तो. आता ही तो प्रसंग आठवून अंगावर काटा आला. अचानक टीव्ही वर ते दृश्य दिसेनासे झाले…आणि मग थोड्यावेळाने अपघाताचे वृत्त झळकले. अपघाताचे कारण म्हणजे उड्डाणादरम्यान यानाच्या बाह्य टाकीतून फोमचा तुकडा तुटून पंखाला लागला होता. साऱ्या भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला..कारण यान अगदीच पृथ्वी जवळ आलेच होते. काही क्षणात पृथ्वीवर त्यांचे पाऊल पडणार होते. परंतु या अपघाताने साऱ्यांची घोर निराशा झाली आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपल्या या नवदुर्गेचा यात अंत झाला . ही रणरागिणी कल्पना चावला आपल्या कायम स्मरणात राहणार आहे.

त्यांचे अवशेष झायॉन राष्ट्रीय उद्यानात विखुरण्यात आले.

 

 

कल्पना चावला यांचे स्मरणार्थ त्यांचे नाव विविध ठिकाणी देऊन भारतीयांनी आणि अमेरिकनवासीयांनी त्यांना एक आगळी श्रद्धांजली वाहिली.

कल्पना चावला यांच्या नावाने अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या:…….

 

पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह.

“कल्पना-१” हा उपग्रह.

मंगळावरील कोलंबिया टेकड्यांतील एक शिखर.

टेक्सास विद्यापीठातील “कल्पना चावला सभागृह”.

फ्लोरिडा तंत्रज्ञान संस्थेतील निवास इमारत.

चंद्रावरील एक खड्डा.

हरियाणातील “कल्पना चावला तारांगण”.

S.S. कल्पना चावला अंतराळयान.

 

अशा या प्रथम अंतराळवीर महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

 

कल्पना चावला

 

या नवदुर्गेस नवरात्री उत्सवा निमित्त माझा मानाचा मुजरा….

🙏🙏🙏

 

…………………………………………………………..

© पल्लवी उमेश

जयसिंगपूर

25/9/2025

प्रतिक्रिया व्यक्त करा