You are currently viewing ओरोस घटनेनंतर खड्डेमय रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर

ओरोस घटनेनंतर खड्डेमय रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर

रस्त्यांवरील त्रुटींवर होईल कारवाई : संदीप गावडे

जर्मन नोकरी प्रकरणी शासन चौकशी अनिवार्य; युवराज लखमराजे भोंसले

सावंतवाडी :

ओरोस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. सरकारी अधिकारी असलेल्या महिलेला यात प्राण गमवावा लागला याच दुःख आहे‌. येथील रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रविंद्र चव्हाण यांनी हा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला, आताही होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचही त्याकडे लक्ष आहे असं मत भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे झालेल्या दुर्घटनेबाबत विचारल असता ते बोलत होते.

श्री. गावडे पुढे म्हणाले, चूकीचे काम होत असेल तर त्यावर कार्यवाही केली जाईल. यापूर्वीची परिस्थिती यापेक्षा वेगळी होती. श्री. चव्हाण यांनी हा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री नितेश राणेंच देखील लक्ष यावर आहे‌. योग्य कार्यवाही होईल, असे मत श्री. गावडे यांनी व्यक्त केले.

*शासनस्तरावर चौकशी होईल : युवराज लखमराजे भोंसले*

दरम्यान, जर्मन देशातील बाडेन वूटेनबर्ग या राज्यासोबत झालेल्या करारानुसार जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात झालेल्या फसवणूकीबाबत माजी आमदार श्री. नाईक यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, जर्मनी येथील नोकऱ्यांबाबत राज्य शासन चौकशी करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाहीत. युवक म्हणून आमच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही. चौकशीनंतर खुलासा देखील मिळेल असे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा