नाशिक :
साहित्य, शिक्षण व सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आपली अमीट छाप उमटणाऱ्या, दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित, के.एल.पोंदा.हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका आणि कवयित्री अनुपमा जाधव यांना दिनांक २८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय क्रांती ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अनुपमा जाधव या केवळ एक शिक्षक नसून त्या एक संवेदनशील कवयित्री,कुशल साहित्यिका, व सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्या आहेत.त्यांच्या समुद्रसंगीत, वहिवाट,रानझरा, या काव्यसंग्रहासह, अनुबंध हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रबोधनासाठी त्यांनी लिहिलेलं गीत, डहाणू नगरपरिषदेच्या घंटागाडीवर प्रसारित झाले आहे.
शैक्षणिक , सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
अनुपमा जाधव यांचा हा पुरस्कार त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची पावती ठरला असून शिक्षण व साहित्य या क्षेत्रातील नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
पुष्प रत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित क्रांतीसूर्य क्रांती ज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्काराचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सरचिटणीस मा.नितिन ठाकरे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.ओमकार पवार, ज्येष्ठ पत्रकार मा.किरण लोखंडे, नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मा.दत्तात्रय कराडे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु मा.डाॅ.संजीव सोनवणे, शिक्षण उपसंचालक मा.संजयकुमार राठोड व समाज कल्याण सहायक आयुक्त मा.देविदास नांदगावकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यसोहळ्यास महाराष्ट्रातून निवडलेल्या गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रा.डाॅ.आनंद अहिरे लिखित प्राध्यापकांना घडविणारा प्राध्यापक या ग्रंथाचे प्रकाशनही होणार आहे.
