“सिंधुदुर्गच्या आरोग्य क्षेत्राला नवे बळ; ८९ आरोग्य सेविकांना नियुक्ती आदेश वाटप”
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर ८९ आरोग्य सेविकांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले आहे.
ही महत्त्वाची प्रक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आली. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि गावांमध्ये महिलांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
या नियुक्तींमुळे अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रिया मार्गी लागली असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील अपूर्णता दूर होण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य सेविका पदासाठी पात्र ठरलेल्या महिलांना अखेर शासकीय सेवा मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या उपक्रमामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली असून, स्थानिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवेला गती देणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
