“भजन सदन उभारणीस भाजपचा पाठिंबा – प्रभाकर सावंत
तुळस येथे राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे भव्य उद्घाटन”
वेंगुर्ले
भजन ही आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची अमूल्य ठेव आहे आणि कोकणने ही कला आजवर जीवापाड जपली आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तुळस येथे केले. निमित्त होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे.
वैभव होडावडेकर व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनी आपल्या भाषणात भजन कलेच्या जतनासाठी कोकणातील योगदानाचे कौतुक करत कणकवली येथे उभारण्यात येणाऱ्या ‘भजन सदन’ प्रकल्पाची माहिती दिली. हा प्रकल्प खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने साकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीष दळवी होते. व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले, महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य गुरुनाथ राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, तसेच विविध तालुकास्तरीय पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे भजन परंपरेचा नव्या पिढीला वारसा लाभेल आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळेल, असे मत मनीष दळवी यांनी व्यक्त केले. लखनराजे भोसले यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले तर वैभव होडावडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्यास तुळस व परिसरातील असंख्य कार्यकर्ते, माजी सरपंच, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यातून कोकणात भजन संस्कृतीला मिळणारा आधार स्पष्ट दिसून आला.
