वेंगुर्ला :
शासनामार्फत राबविण्यात असलेल्या व पंचायत समिती वेंगुर्ला मार्फत घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धा (2023-24) मध्ये पालकरवाडी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला आहे. वेंगुर्ले भटवाडी येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय हॉल येथे झालेल्या तालुकास्तरीय कार्यशाळेत रोख रक्कम 5 लाख रुपये बक्षीस व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ स्वरूपात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील यांच्याकडे हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, उपसरपंच नंदिता शेर्लेकर, सदस्य दिपक मोहिते, विकास अणसुरकर, संगीता परब, दर्शना पालकर, यशवंत कापडी आदी उपस्थित होते. हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे प्राप्त झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
