You are currently viewing प्रेरणा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात “शाळा तिथे दाखला” उपक्रम राबविण्यास सुरुवात

प्रेरणा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात “शाळा तिथे दाखला” उपक्रम राबविण्यास सुरुवात

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची कुडाळ-पडतेवाडी शाळेला भेट

कुडाळ :

 

जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्या मध्ये दुवा साधणे तसेच मुलांना प्रेरणा देणे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेकडील कुडाळ-पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ पडते विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा तिथे दाखला हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून पडतेवाडी शाळेतील काही मुलांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वय आणि जातिवाचक प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कुडाळ-पडतेवाडी शाळेला भेट दिली. कोकण विभागाच्या आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एखाद्या शाळेला भेट द्यायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ-पडतेवाडी शाळेला भेट दिली.

त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “एक शासकीय अधिकारी कोण असतो, हे विद्यार्थ्यांना समजणे, मुलांनी आणि अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधणे, यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते” असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व राजपत्रित अधिकारी यांनी वेळोवेळी शाळांना भेट देऊन मुलांशी संवाद साधावा. यामुळे शाळा व प्रशासन यांच्यातील गॅप दूर होण्यास मदत होईल.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत “शाळा तिथे दाखला” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

विद्यार्थी भविष्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीसाठी जाताना त्यांना वय व जातीच्या दारखल्यांची आवश्यकता असते. हे दारखले काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ व गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेत मदत म्हणून प्रशासनाने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आवश्यक दारखले प्रशासन स्वतः वितरित करणार आहे.

यासाठी शिक्षण विभाग व महसूल विभाग समन्वयाने काम करणार असून विद्यार्थ्यांकडून आवश्यक अर्ज घेऊन महसूल विभागाकडे सादर करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असेल. महसूल विभाग अर्जांची पडताळणी करून विद्यार्थ्यांना जात आणि वय दारखले देणार आहे.

पूर्ण सेवा पंधरवड्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांना दारखले देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार नागेश शिंदे, अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी श्री. मसुरकर तसेच पडतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम आणि शिक्षक-पालक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दारखले सहज, शाळेतच उपलब्ध होणार असून, त्यांची भविष्यातील शैक्षणिक व प्रशासकीय अडचण दूर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा