“मल्टीस्पेशालिटीची गरज मान्य, पण उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व अबाधित राहायला हवे – डॉ. ऐवळे
सावंतवाडी
सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणे ही काळाची गरज असली, तरी त्याच्या गडबडीत उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व कमी होऊ नये, यासाठी सावंतवाडीकरांनी सजग राहावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे.
सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित आरोग्य उपक्रमांदरम्यान ते बोलत होते. महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. ऐवळे म्हणाले की, “सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा दिली जात आहे. येथील गर्दी पाहता रुग्णालयाचे महत्त्व अधोरेखित होते. भविष्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवर उपचार होतील, पण सामान्य तपासणी, प्रसूतीसारख्या सेवांसाठी उपजिल्हा रुग्णालयच उपयुक्त ठरेल. त्यामुळे या रुग्णालयाचा दर्जा टिकवणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मी व सर्जन डॉ. पांडुरंग वजराटकर लवकरच निवृत्त होत आहोत. काही डॉक्टरांनी बदलीसाठी अर्जही केले आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. नागरिकांनी तसेच राजकीय नेत्यांनी यासाठी आवाज उठवावा.”
यावेळी मनीष दळवी, संजू परब, लखमराजे भोसले, अशोक दळवी आदींनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्याचे कौतुक करत, रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभही रुग्णांना देण्यात आला. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व मान्यवरांनी यावेळी केले.
