You are currently viewing १८ सप्टेंबरला कांदळगाव- महान गावचा देवतांचा पारंपरिक भेट सोहळा

१८ सप्टेंबरला कांदळगाव- महान गावचा देवतांचा पारंपरिक भेट सोहळा

भेट सोहळ्यात राणे-परब मानकरींच्या उपस्थितीत पूजा, अभिषेक, महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रम; भाविकांची महान गावी मोठ्या संख्येने उपस्थिती

 

मालवण :

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या देवतांचा वार्षिक पारंपरिक भेट सोहळा १८ सप्टेंबर रोजी महान गावी होणार आहे. या सोहळ्यावेळी रयतेच्या रक्षण, रखवालीसाठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे रखवलीचे श्रीफळ राणे-परब बारापाच मानकरी यांच्या जवळ देण्यात येणार आहे. या देवतांच्या भेट सोहळ्यादरम्यान भाविकांची महान गावी गर्दी होणार आहे.

गुरुवारी सकाळी कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब मानकरी श्री रामेश्वर देवालयात जमून गाणे करून झाल्यावर कांदळगाव मातरणावळकन जुन्या पारंपरिक वाटेने रयत सवाया लवाजम्यासमवेत महान या गावी येणार आहेत.

१८ रोजी सकाळी महानचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर देवाची विविध पूजा, अभिषेक, रक्षण रखवलीच्या श्रीफळाचे पूजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर गांगेश्वर देवाला कोल प्रसाद लावून रक्षण रखवलीचे श्रीफळ राणे-परब मानकरी यांच्या जवळ देण्यात येणार आहे.

श्रीफळ घेऊन समस्त राणे-परब बारापाच मानकरी सवाया मिळवून मातरणावळकन कांदळगाव येथे येणार आहेत. नवसांनी उत्सवात देवीची पालखीही सोहळ्यात निघणार आहे.

मंदिरात हे रखवलीचे श्रीफळ ठेवण्यात येणार आहे. नंतर दिवसभर भजन, पूजन, जागर होणार आहे. दसरा उत्सवादिवशी हे रखवलीचे श्रीफळ बारापाच मंडावर आणण्यात येणार आहे.

यावेळी कांदळगाव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब बारापाच मानकरी व महान श्री देव गांगेश्वर देवस्थानचे बारापाच मानकरी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा