You are currently viewing वेंगुर्ल्यात उद्या भव्य रक्तदान शिबिराने “सेवा पंधरवड्याचा” शुभारंभ

वेंगुर्ल्यात उद्या भव्य रक्तदान शिबिराने “सेवा पंधरवड्याचा” शुभारंभ

*वेंगुर्ल्यात उद्या भव्य रक्तदान शिबिराने “सेवा पंधरवड्याचा” शुभारंभ*

*जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते होणार शिबिराचे उद्घाटन*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने देशभरात “सेवा पंधरवडा” विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून वेंगुर्ला येथे उद्या (१७ सप्टेंबर) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराद्वारे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते होणार आहे.
हे रक्तदान शिबिर बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी ९.०० वाजता सुरू होईल. या उपक्रमासाठी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक सामाजिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संघटना व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा सिंधुदुर्ग , भाजपा युवा मोर्चा , युवक व खेळ मंत्रालयाचे ‘मेरा युवा भारत – सिंधुदुर्ग’, वेताळ प्रतिष्ठान तुळस, खर्डेकर महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस विभाग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांनी संयुक्त पुढाकार घेतला आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तदान हे केवळ एका गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्याचे कार्य नसून समाजात मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. रक्ताचा तुटवडा भासल्यामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रियाग्रस्त तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आयोजित होणारे रक्तदान शिबीर जनजागृतीचे आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण ठरणार आहे.
भाजपाच्या वतीने सांगण्यात आले की, सेवा पंधरवड्यात रक्तदानाबरोबरच स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, निराधारांना मदत, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अशा विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. समाजाशी सातत्याने जोडलेले राहणे आणि सेवा कार्यातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच या उपक्रमामागचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वेंगुर्ला शहर व तालुक्यातील नागरिकांना या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. महाविद्यालयीन तरुण, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व महिला मंडळींच्या सहभागामुळे हे शिबिर एक भव्य उत्सवमय स्वरूपाचे होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन रक्तदान शिबिर यशस्वी करावे , असे आवाहन भाजपा मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा