*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा सुनंदामाई पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*
*बाजार नाही*
लेखणी माझी तशी अलवार नाही
थाटता आला तिला बाजार नाही
कां बळीने वावरातच जीव द्यावा
पावसाने ठेवले घरदार नाही
वाट थोडी वाकडी दिसली मलाही
जायचे आहेच मी वळणार नाही
शस्त्र झालेल्या जिभांनी वार केले
कुंकवाने मज दिला आधार नाही
पांढऱ्या शब्दांस माझ्या का पुसावे
मांडला येथे कसा शृंगार नाही
हुंदक्यांच्या वाहते येथे पखाली
लागली डोळ्यास माझ्या धार नाही
का अपेक्षा वाढल्या मी गीत गावे
लेखणीच्या अंतरी गंधार नाही
अर्जुनाने शर्थ केली जिंकण्याची
सारथी पण कृष्ण आढळणार नाही
सांग रामाला नको सीतेस टाळू
जानकी येथे पुन्हा जळणार नाही
*गझलनंदा*

