You are currently viewing स्वायत्त संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री(शहरे) नाम.योगेश कदम यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

स्वायत्त संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री(शहरे) नाम.योगेश कदम यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

*स्वायत्त संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री(शहरे) नाम.योगेश कदम यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*

*केसरकरांना मंत्रीपद द्या अशी मागणी करताना आनारोजीन लोबोंना अश्रू अनावर*

सावंतवाडी:

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री(शहरे) नाम.योगेश कदम यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा सुरू असून गेली काही वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाम.योगेश कदम यांचे स्वागत केले. यावेळी नाम.कदम यांनी आम. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. आम.केसरकर यांच्या निवासस्थानी नाम.कदम पत्रकार परिषदेस संबोधित करताना केसरकर यांच्या कट्टर समर्थक माजी नगराध्यक्षा आनारोजिन लोबो यांनी “आमच्या दीपकभाईंनी शिवसेना वाढवली, त्यांना मंत्री करा” अशी मागणी केली त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. नाम.दीपक केसरकर यांनी ही जागा अशी मागणी करण्याची नाही असे म्हणत वेळ मारून नेली. पण…., आम केसरकर यांना मंत्रीपद न मिळाल्याची खंत त्यांच्या आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसून आले.
आम.दीपक केसरकर यांनी शिवसेना फुटून शिंदेंची शिवसेना नावारूपास आली त्यासाठी अथक परिश्रम घेतले होते आणि पक्ष वाचविण्यापासून पक्ष वाढविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे शिवसेना वाढीमध्ये त्यांचे योगदाम नक्कीच महत्त्वपूर्ण होते. परंतु त्यांना मंत्रीपद का मिळाले नाही…? हा कंसातील प्रश्न असू शकतो. परंतु.., लोबो या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करावी की अलीकडेच मंत्रीपद मिळालेल्या केसरकर यांच्या कनिष्ठ सहकाऱ्याकडे मागणी करावी..? हा प्रश्न वादातीत आहे. आम.केसरकर हे पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्यांचे पक्षातील आणि एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारणात वजन आहे, त्यांची एक हुशार राजकारणी तसेच अभ्यासू, बुद्धिमान नेता अशीही ओळख आहे. शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कारभार केला आहे. विना अनुदानित शिक्षक वर्गाचा न सुटलेला प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे अवघा महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराच्या नजरेने पाहतो. एकेकाळी नारायण राणेंना टक्कर देणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते. अशा धुरंधर, शक्तिशाली नेत्याला मंत्रीपद मागणी आनारोजिन लोबो यांनी राज्यमंत्र्यांकडे केल्याने नक्कीच अनेकांना आश्चर्य वाटले.
आम.केसरकर यांना मंत्रीपद देण्याची मागणी करतांना लोबो यांना अश्रू अनावर झाल्याने आम.केसरकर आणि प्रवीण भोसले यांच्यातील टोकाच्या वादामुळे केसरकर यांनी शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत जाताना शरद पवारांसमोर ओक्साबोक्शी रडलेल्या आनारोजिन लोबो आज पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकारांना आठवल्या. त्यावेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकताना केसरकरांनी “शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखवणार” असे विधान केले होते.
आम.केसरकर यांनी विधान केल्याप्रमाणे कात्रजचा घाट दाखवला की नाही हे सर्वांनी पाहिलं आहेच परंतु, त्यावेळी जिल्ह्यात एक दोन नंबरवर असलेल्या राष्ट्रवादीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपलं गाठोडे बांधायला लावलेलं एवढं मात्र नक्की. कारण, तेव्हापासून जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्तास्थाने गेली ती आजपर्यंत मिळाली नाहीत की राष्ट्रवादीला म्हणावं तेवढं जिल्ह्यात भक्कम नेतृत्व लाभले नाही आणि कधीही उभारी मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार असलेल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री असलेल्या नाम.अजित पवार यांचा दबदबा असल्यामुळे केसरकरांना मंत्रीपद मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.
परंतु….,
या सर्व घडामोडीनंतर जिल्ह्यातील तीन पैकी तिन्ही जागा महायुतीकडे तर दोन मतदारसंघावर शिवसेनेची सत्ता राखणारे आम.केसरकर आणि त्यांचे कार्यकर्ते आजही मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत हे मात्र निश्चित..!

प्रतिक्रिया व्यक्त करा