उघडले दार जिल्हा प्रशासनाचे
उजळले भवितव्य तरुणांचे
अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांचा उपक्रमशील जिल्हाधिकारी म्हणून सर्वत्र महाराष्ट्रात नावलौकिक आहे. अमरावतीला आल्याबरोबर त्यांनी पहिले काम कोणते केले असेल तर युवकांना जागे करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरित करण्यासाठी यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला. त्यासाठी अमरावतीतील संपूर्ण महाराष्ट्रात भव्य असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनची त्यांनी निवड केली. अमरावतीमधून जे विद्यार्थी आयएएस झालेले आहेत त्यांना निमंत्रित केले. या कार्यक्रमाला पालकांची शिक्षकांची व विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती होती. अगदी पाय ठेवायला देखील जागा नव्हती. यावर्षी आयएएस झालेले धामणगाव चे श्री रजत पत्रे धारणीचे श्री शिवांग तिवारी व वरुडच्या कुमारी नम्रता ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे श्री आशिष येरेकर यांनी या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजना महापात्र मनपा आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यासमोर आदर्श अधिकारी कसे असतात हे दाखवून दिले. स्वतः आशिष येरेकर पूर्णवेळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम संपला तरी स्टेजवर आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांना भेटण्याची त्यांची सही घेण्याची त्यांच्यावर फोटो काढण्याची विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागली होती. कार्यक्रम संपल्यानंतरही सांस्कृतिक भवन एका तासानंतर खाली झाले. एक चांगला पायंडा या निमित्ताने श्री आशिष येरेकर यांनी पाडला आहे.
दर महिन्याच्या पाच तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा पायंडा सुप्रसिद्ध पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी नांदेडला असताना पाडला आणि त्याचे अनुकरण अमरावती अकोला चंद्रपूर व इतर जिल्ह्यात झाले. पण काही कालावधीनंतर हा उपक्रम खंडित झाला .पण या उपक्रमाला पुनर्जिवित केले ते अमरावतीचे क्रियाशील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी .
आता तर त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करायचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नियोजन भवनांमध्ये येत्या सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांनी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली आहे. जिल्हा नियोजन भवनात फारसे कार्यक्रम नसतात. असतात त्या सभा. आणि सायंकाळी पाच वाजता नंतर तर हे सभागृह खालीच असते. त्याचा लाभ श्री येरेकर यांनी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी करून दिला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत .
जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात स्पर्धा परीक्षा शिबीर आयोजित करून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नियोजन भवन पाहायला मिळेल. आपल्याकडे मुले नेहमी डॉक्टर आणि इंजिनियर यांनाच पाहतात. त्यांचे मोठे मोठे बंगले पाहतात .त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या पाहतात. मग त्यांनाही डॉक्टर व्हावेसे वाटते .पण ही मुले जेव्हा कलेक्टर ऑफिस पाहतील. खरोखरच्या कलेक्टरला पाहतील. त्यांचे कार्य पाहतील .तेव्हा त्यांच्यामधील प्रशासनात जाण्याची ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही आणि हीच मध्यवर्ती कल्पना मनाशी ठेवून श्री आशिष येरेकर यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
साधारणतः आपल्या भागातील विद्यार्थी हे आयएएस किंवा एम पी एस सी या परीक्षेचा अभ्यास करतात आणि हा केंद्रबिंदू लक्षात घेऊन श्री येरेकर यांनी विद्यार्थ्यांना नुकत्याच आय ए एस झालेल्या श्रीमती कौशल्या एम.यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या आयएएस विषयीच्या शंका समाधान करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. काही वर्षांपूर्वी आय ए एस झालेले अधिकारी अगदी अप टू डेट विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकतील असे नाही. पण नुकतेच पास झालेले विद्यार्थी ताजे तवाने असतात आणि त्यांचा वयोगट आणि विद्यार्थ्यांचा वयोगट हा मिळताजुळता असतो. त्यामुळे त्यांनी प्रशासनामध्ये नुकत्याच रुजू झालेल्या श्रीमती कौशल्या मॅडम यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या मनात व हृदयात शिरण्याचा आणि त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे. त्यासाठी त्यांनी श्रीमती सोनल सूर्यवंशी यांना निमंत्रित केलेले आहे .त्या देखील नुकत्याच एमपीएससी पास होऊन प्रशासनात रुजू झालेल्या आहेत. सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना बरेच काही देऊन जाईल.
मला आठवते आम्ही 2008 साली श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेला आजचे सुप्रसिद्ध व गाजलेले आयएएस अधिकारी श्री तुकाराम मुंढे यांना मी निमंत्रित केले होते. ते नुकतेच आयएएस झाले होते.
त्या कार्यक्रमाला बिच्छू टेकडी चपराशी पुरा या भागात राहणारी पल्लवी चिंचखेडे नावाची विद्यार्थिनी आली होती. तिला त्या कार्यक्रमातून एवढी प्रेरणा मिळाली की ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आज दिल्ली येथे सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झालेली आहे. बिछूटेकडी चपरासी पुरा या भागामध्ये राहणारी गरीब कुटुंबातील पल्लवी चिंचखेडे जर सनदी अधिकारी होऊ शकते तर दिनांक 8 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून नक्कीच अनेक पल्लवी घडल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी श्री आशिष येरेकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल ते अभिनंदन आस पात्र आहेत .
खरं म्हणजे आशिष येरेकर हे कर्तृत्व जिल्हाधिकारी आहेत. ते प्रोबेशनवर असताना गडचिरोली जिल्ह्यात होते. गडचिरोली जिल्हा म्हणजे मागासवर्गीय तसेच नक्षलग्रस्त जिल्हा. पण या जिल्ह्यातही त्यांनी वेगवेगषळे प्रयोग करून जिल्ह्यातील लोकांना आपलेसे केले. गडचिरोली जिल्ह्यातील मुले मेडिकल साठी आवश्यक असलेली नीट व अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेली जे डबल इ या परीक्षेत मागे आहेत असे लक्षात येताच त्यांनी नांदेड लातूर सारख्या गाजलेल्या शहरातील या विषयातील तज्ञ अध्यापकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुक केले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ एवढा झाला की वरील परीक्षेमध्ये गडचिरोली जिल्ह्यात जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गडचिरोली ला असताना विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जसे उपक्रम राबविले तसेच महिलांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी तामिळनाडू येथील एजन्सीची संपर्क साधून महिलांसाठी गृह उद्योगातून विविध वस्तू बनविण्याचे कार्य सुरू केले. त्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला .पण त्यासाठी श्री येरेकर यांनी घेतलेला पुढाकार फारच महत्त्वाचा आहे. बरेचसे अधिकारी मी भला आणि माझे काम भले. या चौकटीत वावरतात .पण श्री येरेकर यांनी या चौकटीला छेद दिला आहे. आणि एक जिल्हाधिकारी काय करू शकतो याचा आराखडा त्यांनी समाजासमोर मांडला आहे.
त्यांना अमरावतीला येऊन फार कालावधी झालेला नाही .पण या अल्पकालावधीमध्ये त्यांनी आपल्या प्रगतिशील उपक्रमाने अमरावतीकरांना जिंकून घेतले आहे. असेच उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या गेले तर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेच्या जगतात पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गेल्या पंचवीस वर्षात 17 हजार स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर आणून ठेवले आहे. येरेकर साहेबांसारखे जिल्हाधिकारी तर प्रत्येक जिल्ह्याला लाभले तर हा तिसरा क्रमांक पहिल्या क्रमांकावर जायला वेळ लागणार नाही .
या कार्यक्रमापासून अमरावती शहरातील प्राचार्यांनी प्राध्यापकांनी मुख्याध्यापकांनी धडा घेण्याची वेळ आता आली आहे. एक जिल्हाधिकारी दर दर महिन्याला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊ शकतो तर आपल्याकडे तर हॉल आहे. विद्यार्थी आहेत .साऊंड सर्व्हिस आहे आणि शासनाने तर आता आपली शाळा डिजिटल केलेली आहे .तर आपण देखील श्री येरेकर साहेबांचे अनुकरण करून दर महिन्याला किंवा दोन महिन्यातून एकदा एक तरी स्पर्धा परीक्षा किंवा प्रेरणात्मक व्याख्यान आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केले पाहिजे व महाराष्ट्राला मराठी पाऊल पडते पुढे या नात्याने पुढे नेले पाहिजे.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003

