You are currently viewing पितृपक्ष…

पितृपक्ष…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*पितृपक्ष…*

 

मला आठवते, सकाळी अंघोळ झाल्या झाल्या आई मला सांगायची, “ बाई, दारले निवतं दि दे

बरं”..

मग मी ओल्या कपड्याने उमरट स्वच्छ पुसून हळद कुंकू तांदूळ ताटात घेऊन उमरटाला हळदी कुंकूच्या रेघा ओढून अक्षता वाहून म्हणत

असे, “आजोबा आजी तुम्ही सर्वांनी आज जेवायला या.”.. हळदी कुंकू वाहिलेले ते उमरट

फार छान प्रसन्न दिसत असे.

 

आणि मग आईचा तो पुरणाचा घाट. आठ दिवस

आधी गहू वलायचे, जात्यावर दळायचे, साडी बांधून गाळायचे, र वा पिठी वेगळी करायची

अशी कामे चालत व पित्रांची जोरदार तयारी होत

असे. खेड्यात पित्रं जेवणार म्हणजे ५/१० लोकांची तरी पंगत असतेच. म्हणजे बघा, जेवणाचा केवढा घाट असे तो. एवढ्या खापरावरच्या पोळ्या, त्या साठी पहाटे लवकर

उठून कणिक भिजवून ठेवायची, चुलीवरती लाकडे पेटवून एवढ्या पोळ्या, खीर, रशी, भात,

भजे, कुरडया तळायच्या.. राम राम राम.. केवढे ते

काम हो! तेव्हा आई हे सारं एवढं कसं करत असेल हे आठवून आता वाईट वाटते.

 

त्यातून आमच्या घरी तर वडिलांचा जेवणाचा राजेशाही थाट असे.दोन बादल्या गरम पाणी, टॅावेल, साबण, बाहेर ओट्यावर हात धुवायला

असे. बसायला एक मोठे चौरंगी पाट व समोर ताट ठेवायलाही तसेच मोठे पाट ठेवावे लागत

असे. आमच्या सामानाच्या खोलीत अशी पाटांची

एकावर एक थप्पी असे. तिथून पाटं काढायची.

ती फडक्याने स्वच्छ पुसायची. मांडायची. मग एका काचेच्या ग्लासात पाऊण ग्लास तांदूळ भरायचे. मुठभर अगरबत्या पेटवून फुंकून त्यात

ठेवायच्या. मग तो ग्लास पहिल्या पाटाजवळ

ठेवायचा. घरभर सुगंध दरवळत असा काही पसरायचा की ह्या दारातून त्या दारापर्यंत तो वाऱ्याने धावत दरवळायचा..

 

मग एकेक पाहुणा हात धुवायला गेला की एक

माणूस त्याच्या हातावर तांब्याने पाणी ओते व लगेच हातात टॅावेल दिला जाई नि एकेक पाहुणा

पाटावर येऊन बसे. बाजूला तांब्यापेला भरून ठेवलेला असेच. मग आई भल्या मोठ्या ताटांमध्ये गरमागरम पुरणपोंळी, ताटलीत तांदळाची खीर, वाटीत रश्शी, जवळच भात, कुरड्या पापड असे वाढून दिल्यावर आम्ही एकेक ताट पाहुण्यांसमोर नेऊन ठेवत असू.

 

सालदाराने एका भल्यामोठ्या पाटीत धगधगत्या

गोवऱ्या पेटवून ठेवलेल्या असत.वडील नास्तिक होते.

आई म्हणायची, “ थांबा हो, आगारी टाकू द्या आधी, काही तोंडात टाकू नका”. मग प्रत्येक जण

जवळ ठेवलेल्या वाटीत आपल्या ताटातून घास काढून देत असे. अशा त्या सर्व वाट्या त्या धगधगत्या अग्नीत अर्पण होवून वर भरपूर गावरानी तुपाचा शिडकावा होताच अग्नी अजून

पेटत घरभर व आसमंतभर धूर पसरे. पितरांना

असे तृप्त करून मग आपल्या ताटाभोवती पाणी

फिरवत सारेच जेवणावर आडवा हात मारत असत व आम्हा वाढणाऱ्यांची मात्र पळापळ होत असे. पोई लया, खीर वाढा असे वडिलांचे सतत फर्मान चालू असे व भरपूर तुपासह मंडळी जेऊन

तृप्त होत ढेकर देत उठत व पुन्हा एकजण हातावर पाणी व टॅावेल घेऊन उभा राही.मग ते

बैठकीत स्थानापन्न झाल्यावर पानांचे विडे बनत

व त्यांच्या गप्पा सुरू झाल्यावर वाढणारे सालदार

व बाजूलाच बायकांची पंगत बसे. असा तो पहाटे

सुरू झालेला कार्यक्रम संपायला चार वाजून जात असत. पूर्वी काही धुण्याभांड्याला बायका

नसत. केवढे ते काम पण सर्व मिळून हातोहात

करत असत.

 

पितरं येतात की नाही? कावळे खातात की नाही

या पेक्षा , समजा मी हे सारे लहानपणी पाहिले नसते तर आज माझ्या मनावर गेलेल्या वाडवडिलांचा हा जो संस्कार झाला आहे तो झाला असता का? आज मी हे लिहू शकले असते

का? एरवी तुम्ही पूर्वजांची आंठवण कशी काढणार आहात? की नाही? कोणत्या निमित्ताने

काढणार? ज्यांनी आपल्याला लाडाने वाढवले, ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्यांच्या

मुळे या सुंदर जगात येऊन हे सुंदर जग आपल्याला बघायला मिळाले त्यांची आठवण

करणे आपले कर्तव्य नाही काय? नक्कीच आहे.

म्हणून, पितृपंधरवाड्याच्या निमित्ताने का होईना

घरोघर पितरांची आठवण केली जाते, त्यांचे फोटो बाहेर येतात, मुलाबाळांना त्यांचे दर्शन होते, ओळख पटते व काही एक उपकृत होण्याचा, जाणण्याचा संस्कार मनावर होतो त्या

दृष्टीने हा पितृपक्ष मला महत्वाचा वाटतो. काहीही झाले तरी आपल्याला इथपर्यंत आणून

सोडणारा ते “ दुवा” आहेत हे तर नक्कीच आहे

ना? त्यांच्यामुळे आपण घडलो, इथपर्यंत आलो,

मनाला काही एक विशिष्ट वळणं त्यांच्यामुळे

मिळाले, जगण्याचे अनुभवाचे संस्कार मिळालेच,

काही काही तर त्यांचाच चेहरा घेऊन जन्माला

येतात इतका की हा आमक्याचा नातू आहे वाटतं? इतकं साधर्म्य आपण घेऊन येतो असे पूर्वज रोज आठवले नाहीत तरी काही प्रसंगानुरूप त्यांना आठवणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते? खरे आहे ना? म्हणून मला हा पितृपक्ष महत्वाचा वाटतो.

 

आपले पूर्वज अत्यंत चाणाक्ष होते. उगीचच त्यांनी विनाकारण निर्रथक प्रथा सुरू केलेल्या

नाहीत. प्रत्येक प्रत्येक प्रथेमागे काही कार्यकारणभाव व संस्कार नक्कीच आहे असे मला वाटते.म्हणून पितृपक्षात खेडेगावात तुम्हाला उत्साहाचेच वातावरण सापडेल. अगदी

गरीबातला गरीब सुद्धा जोडजाड करून पितरांना तृप्त करत स्वत:ही गोडधोड खाऊन तृप्त होतो.

दुसरी बाजू म्हणजे बाजारात सर्वच गोष्टींची चलती होऊन रोजगार वाढतो ते वेगळेच! कमाईची संधी मिळते, भाज्यांचा खप तर गणपती पासूनच जोरात सुरू होतो व भाज्या प्रचंड महाग होतात. भाजीवालेही पैसे कमवून

घेतात. असा हा चलतीचा महिना असतो म्हटले

तरी चालेल. काय मंडळी? तुमचे काय मत आहे?

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा