कुडाळात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५१ प्रकरणे तडजोडीने निकाली…
कुडाळ
आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील कुडाळ न्यायालयात एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाल झाली असून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी वकील आर. डी. बिले, वकील एस. जी. मळगावकर, सहाय्यक सहकारी अभियोक्ता श्रीमती अमृता मिरजे व अन्य वकील वर्ग व पक्षकार उपस्थित होते. या राष्ट्रीय लोक अदालतीचे काम पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश कुडाळ जी ए. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व वकील आर. डी. बिले, वकील एस. जी मळगावकर यांच्या उपस्थितीत लोक अदालतीचे कामकाज पार पडले .या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण १२९ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी ४० प्रकरणे निकाली निघाली. तसेच वादपूर्व ९०६ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली निघाली. एकूण १०३५ प्रकरणापैकी ५१ प्रकरणे निकाली निघून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढ्या रकमेची वसुली झाली .
ही राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया ,बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा ,युनियन बँक ,महाराष्ट्र ग्रामीण बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँकचे शाखाधिकारी तसेच वीज वितरण कंपनी यांचे लेखापाल उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीचे काम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक सी. एस. नाईक, एस. डब्ल्यू. पै तसेच न्यायालयाचे कर्मचारी लघुलेखक एल. डी. सावंत, वरिष्ठ लिपिक आर. टी. आरेकर, एम. बी. भाटकर, तसेच कनिष्ठ लिपिक सौ. एस के म्हाडगूत, श्रीमती पी. डी. केळुस्कर, श्रीमती अमृता हुले, श्री. कारेकर, चपराशी श्री. रेडकर, श्री. चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

