*ज्येष्ठ साहित्यिका गझलकारा सुनंदामाई पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम लेख*
*अभिजात अमृत*
*ऐलमा पैलमा गणेश देवा*
दहा दिवस सगळ्यांचा लाडका बाप्पा याची घरोघरी पूजा झाली आणि बाप्पाचं विसर्जन झाल! पाणावलेल्या डोळ्यांनी आपण त्याला निरोप दिला .
एवढ्यानेच आपले सण संपत नाहीत . अगदी पक्षाच्या पंधरवड्यात कुठलाही सण नसतो असं म्हणतात . मात्र भाद्रपद कृष्ण चतुर्थीला विदर्भात काही ठिकाणी मस्कऱ्या किंवा हाडपक्या गणपती याची स्थापना होते . तोही बाप्पा दहा असतो . तसंच भुलाबाईची स्थापना सुद्धा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होते .
भुलाबाई हा महाराष्ट्रातील विशेषता विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे . उत्सव आहे . जो भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत असतो .या उत्सवात भुलाबाई म्हणजे पार्वती हिची महादेव आणि बाल गणेशासोबत मातीची मूर्ती तयार केली जाते आणि तिची पूजा केली जाते , जी पूजा म्हणजे नवीन आलेल्या धान्याच्या आगमनाचे आणि स्वागताचे प्रतीक आहे . अर्थातच *अभिजात अमृत* या शीर्षकाखाली कवितांविषयी लिहिताना *भुलाबाईची गाणी* हा विषय सोडून चालणार नाही. पूर्वापार मौखिक अंगानं ही सगळी गाणी वारसा हक्काने आम्हाला मिळाली आहेत . आज काही ठिकाणी लिखित स्वरूपात ही गाणी जतन केलेली आहेत . यातही शिवपार्वती यांचीच गाणी आहेत आणि पार्वती हिची विशेषेकरून महत्त्वाची पूजा आहे .
भुलोबा म्हणजे शंकर आणि भुलाबाई म्हणजे पार्वती . हा सण पार्वतीच्या पृथ्वीवरील सर्जनशीलतेचा सण म्हणूनच साजरा केला जातो . श्री गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी पासून तर अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा सण संपूर्ण एक महिनाभर चालतो . यात शंकर पार्वतीची मातीची पार्थिव मूर्ती बनविली जाते आणि मांडीवर बाल गणेश असतो . पारंपरिक पद्धतीने ही पूजा केली जाते . आरती केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो .उत्सवाच्या शेवटच्या दिवशी नदीवर किंवा तलावात या पार्थीव मूर्तीचे विसर्जन केले जाते . पारंपारिक गाणी गाऊन , नृत्य करून हा आनंद उत्सव साजरा केला जातो विशेषता मुलींचा आणि स्त्रियांचा हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो . सर्जनशीलतेचा उत्सव असतो .
भुलाबाई म्हणजे पार्वती . जगन्माता आदिपराशक्ती भूमी सारखी सर्जनशील म्हणून ही माता भुवनेश्वरी . या भूमीच्या सृजनशीलतेचा उत्सव म्हणजे भुलाबाई . भूमी आणि परम प्रकृती स्वरूपा पार्वती मातेचा सर्जनोत्सव . असे मानले जाते की पार्वती भिल्लीनीच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवा सोबत बाहेर येते . बाहेरच्या लोकांना भेटते आणि संपूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्हासित करते . मुलीच्या आगमनाने आई-वडिलां सह सगळी बाहेरची माणसं भारावून जातात आणि हा सण एक उत्सवाप्रमाणे साजरा करतात . तिच्यासाठी विविध पक्वान्न तयार होतात . खेळ खेळल्या . एका माहेरवाशिणीच्या आगमनाची म्हणून शिवशक्तीची ही पूजा आहे . एक प्रकारचा हा सुफलन विधी आहे . शिव शंकराचे प्रतीक या पूजेत आहे . मात्र शिव शंकराची उपस्थिती फक्त नावाला असते अगदी एका जावयाप्रमाणे .
एका आख्यायिकेतनुसार परब्रम्हस्वरूपीनी माता पार्वती आणि शिवशंकर सारीपाट खेळायला बसले . देवर्षी नारदाने त्या ठिकाणी सांगितले की पणाला काहीतरी वस्तू लावल्याशिवाय हा खेळ रंगत नाही आणि पार्वती प्रत्येक डाव जिंकत गेली . शंकराचे गजचर्म व्याघ्रांबर सर्व आयुधे हे शंकराकडून पार्वतीने हिरावून घेतले . दिगंबर शंकर नाराज होऊन वनात निघून गेले आणि पार्वतीने त्यावेळी भिल्लीणीचे रूप घेऊन शंकराला भुलवले आणि ती त्यांना परत घेऊन आली . भुलले म्हणून शंकर भुलोबा आणि भुलविले म्हणून जगन्माता भुलाबाई .
यात पूजा शंकर-पार्वतीची असली तरी हा मुली स्त्रियांचा सण पार्वतीभोवतीच फिरतो . पूर्वी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा सण आज फक्त पाच दिवस किंवा एक दिवस साजरा होतो . म्हणजे दसऱ्यापासून पोर्णिमेपर्यंत किंवा फक्त पौर्णिमेला . कोजागिरी पौर्णिमेला *ज्येष्ठापत्य निरांजन* असेही म्हणतात . म्हणजेच या दिवशी घरातलं जे ज्येष्ठ अपत्य असेल त्याला औक्षण केलं जातं . भेट दिली जाते . त्याच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते.
बऱ्याच ठिकाणी हादगा व भोंडला आणि भुलाबाई एकच प्रकार आहे असं म्हटलं जातं . पण भुलाबाई हा उत्सव सृजनाचा आहे . भुलाबाई राणीचे डोहाळे छान साजरे केले जातात .
*तिचे डोहाळे तिला भारी*
*नेऊन टाका पलंगावरी* अशाप्रकारे मातृत्वाची गाणी यावेळी गायली जातात . हा उत्सव मातृपूजा आणि मातृत्व गौरव असून सर्वतोपरी वेगळा आहे या भुलाबाईच्या गीतांच्या माध्यमातून सुफलीकरणाच्या रूढीचे / परंपरांचे आपल्याला ज्ञान होते .
मूर्तिपूजा केल्यानंतर खरंतर विसर्जनाशिवाय ती उचलली जात नाही . पण भुलाबाईचं सगळंच वेगळं आहे . एका ठिकाणी स्थापना केल्यानंतर तिथे गाणी म्हणता येत नाहीत . म्हणून भराडी गौरी सारखाच भुलाबाईच्या मूर्तीला अंगणात , चौकात किंवा मोठ्या बैठकीत मधोमध ठेवले जाते . तिच्या भोवती कोंडाळं करून बायका आणि मुली बसतात आणि मग गाण्यांना सुरुवात होते .
*ऐलमा पैलमा गणेश देवा*
*माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा*
या गीतांने सुरुवात होते
*भाद्रपदाचा महिना आला*
*आम्हा मुलींना आनंद झाला*
*पार्वती बोले शंकराला*
*चला हो माझ्या माहेराला*
अशा प्रकारच्या गीतांनी अंगण पुलकीत होतं . यातच
*यादव राया राणी रुसून बसली कैसी*
*सासुरवाशी सुन घरास येईना कैसी*
*सासू गेली समजावयाला*
*चला चला सुनबाई आपल्या घराला*
*पाटलाचा जोड देते तुम्हाला*
*पाटल्याचा जोड नको मला*
*मी नाही यायची तुमच्या घराला*
*यादव राया राणी रुसून बैसली कैसी*
नंतर सासरच्या सगळ्या मंडळीची नावे घेऊन , प्रत्येक दागिन्यांची नावे घेऊन हे गीत पूर्ण केले जाते . तरीही राणी घरी जायला तयार नाही . शेवटी नवरोजी आल्यानंतर मात्र ती घरी जायला तयार होते. अशा प्रकारची गीतं म्हणजेच सासरी होणारा छळ किंवा त्रास, माहेरचा आनंद उपभोगणे हे त्याकाळच्या बालविवाहाचे प्रतीक आहे . अगदी…..
*कारल्याचे बी पेर गं सुनबाई मग जा आपल्या माहेरा* हे गीत सर्वांना माहिती आहे. अगदी कारल्याचं बी पेरल्यापासून तर तो वेल वाढला , त्याला कळ्या आल्या , फुलं आली , कारली लागली , त्या कारलीची भाजी केली , नंतर ती भाजी खाऊन जा , असं सासूबाई म्हणतात आणि एक प्रकारे हा त्या छोट्याशा सुनेचा छळ होतो .
आणि मग यातूनच
*सासरच्या वाटे कुचु कुचु काटे*
*माहेरच्या वाटे हळद-कुंकू दाटे*
*पंढरीच्या वाटे नारळ फुटे*
अशा प्रकारच्या गीतांनी जन्म घेतला असावा.. असं म्हणायला वाव आहे . आता हा मातृत्वाचा उत्सव म्हटल्यावर पार्वतीचं गर्भारपण, बाळंतपण, बारसं हे सगळं व्हायलाच हवं .शिवाय ती आपल्या नवऱ्यासोबत माहेर पणाला आलेली आहे . बाळंतपणाला आलेली आहे . त्याचीही अनेक गाणी भुलाबाईच्या उत्सवात गायली जातात . या उत्सवाबद्दल सांगताना अजून आपल्याकडे बरेच दिवस आहेत. म्हणून उरलेला भाग पुढे मी तुम्हाला सांगेन .
तोपर्यंत नमस्कार .
*प्रा. सुनंदा पाटील*
८४२२०८९६६६
