मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळा संपन्न
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामीण भागाची समृद्धीकडे वाटचाल
-पालकमंत्री नितेश राणे
- ग्रामविकासातAI चा उपयोग करा
- लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे
- अभियानाच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्धा
सिंधुदुर्गनगरी दि ११ (जिमाका) :- सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून, गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे ही त्यांची जबाबदारी आहे. गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने, पारदर्शकतेने व जनतेच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाची सुरुवात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी पोहोचेल, गावोगावी विकासाची नवी उर्जा मिळेल आणि ग्रामीण भागाची समृध्दीकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन आज सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पंचायत विकास निर्देशांकात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावल्याबद्दल जिल्हा परिषदेचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध ग्रामपंचायत व पंचायत समित्यांना देखील पुरस्कार व गौरवचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, श्रीमती शिंपी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये जिल्ह्याने सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावणे आवश्यक आहे. पारदर्शक कामगिरी आणि सकारात्मक स्पर्धेमुळेच गावांचा सर्वांगीण विकास होतो. या अभियानाच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्धा घडणार आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवून या अभियानातील निकषांचा अभ्यास करून त्याप्रमाणे कार्यवाही केली तर गावाचे स्वरूप बदलताना दिसेल. लोकप्रतिनिधींनी गावासाठी आवश्यक निधी मिळवून विकासाची कामे करण्यास प्राधान्य द्यावे. पुरस्कार मिळाल्यानंतरही चांगली कामगिरी सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनात जसा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा उपयोग होत आहे, तसाच ग्रामपंचायतींनी देखील आपल्या कारभारात AI चा उपयोग करुन कामे जलदगतीने करावीत. आपला जिल्हा या अभियानात अव्वल क्रमांकावर राहावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. विकास हा गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे,असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर म्हणाले की, ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था महणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा यांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियान हाती घेतले आहे. राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सिधुदुर्ग जिल्हा परिषदेने कामकाजाचे नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायती ८ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत हे अभियान राबविले जाणार आहे. दरम्यान, तालुका स्तरावर प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे १५ लाख, १२ लाख आणि ८ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे रु.५० लाख, ३० लाख, २० लाख, विभाग स्तरावरील प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे रु. १ कोटी ८० लाख आणि ६० लाख तर राज्यस्तरावर प्रथम ३ क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे रु ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून लोकाभिमुख प्रशासन, नागरी सेवा-सुविधा केंद्रांना सेवा केंद्राचा दर्जा देणे, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, सीसीटीव्ही, दफ्तर व लेखे अद्ययावतीकरण, मतदार नागरिक अॅप डाउनलोड करणे, आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे, ५, १०, ११५ टक्केच्या योजनांचे प्रभावी कामकाज करणे, कर आणि पाणीपट्टी १०० टक्के वसुली करणे, सर्व शासकीय संस्थांनी लोकसहभागासाठी प्रयत्न करणे, स्व-उत्पन्न वाढविणे, वॉटर बजेट, पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट थकबाकी शुन्य करणे, पंतप्रधान आवासची कामे पुढे नेणे, इत्यादींबाबतचे गुणांकन त्रयस्थ यंत्रणेमार्फत केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार-
विनायक शंकर जाधव, जिल्हा परिषद पु.पा.शाळा ओझरम नं 1 ता. कणकवली,
विलास रामचंद्र फाले, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा माडखोल नं.1,
उदय विठ्ठल गवस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळये,
रामा वासुदेव पोळजी, जिल्हा परिषद, पु.प्रा.शाळा मठ कणकेवाडी नं.3,
बाबाजी सुरेश भोई, जिल्हा परिषद शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगांव,
संजय शामराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिर्ये नं.1,
दिनकर शंकर केळकर, पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर वैभववाडी,
चंद्राकांत गणपती कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेरी मळा.
